पैशाचा पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धेतून नरबळी?
अकोल्यातील हेमंतच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचा आरोप

अकोला /19 नोव्हेंबर: अकोल्यातील हेमंत प्रफुल्ल सपकाळ या तरुणाचा इंदूर येथे मृत्यू झाल्यानंतर ’पैशाच्या पावसा’साठी अघोरी पूजा करून त्याचा नरबळी दिल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. बारा नोव्हेंबरला घरातून निघालेल्या हेमंतने पंधरा नोव्हेंबरला भावाला फोन करून जीवाचा धोका सांगितल्यानंतर दुसर्या दिवशी त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली.
बारा नोव्हेंबरच्या सायंकाळी अमरावतीला जातो असे सांगून निघालेल्या हेमंतसोबत विवेक उर्फ विक्की शिंदे, अजय गायकवाड आणि आणखी एक जण असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हे तिघे अकोल्यातील उमर परिसरात राहणारे आहेत. पंधरा नोव्हेंबरच्या दुपारी दोन वाजता दुसर्या दिवशी घरी परततो असे सांगणार्या हेमंतने त्याच दिवशी संध्याकाळी भावाला फोन करून आपल्याला इंदूरला आणल्याचे सांगितले आणि रात्री मारणार असल्याचे सांगून वाचवण्याची विनंती केली. विवेक उर्फ विक्की शिंदे वारंवार फोन करून बोलावून घेत असल्याचेही त्याने भावाला कळवले. त्यानंतर त्याचा मोबाईल अचानक बंद पडला. मध्यरात्री बारा वाजता भावाने विवेकशी संपर्क साधल्यावर ते रेल्वेत असून हेमंत मागच्या डब्यात असल्याचे विवेकने सांगितले. सोळा नोव्हेंबरच्या सकाळी अकरा वाजता हेमंतचा फोन पुन्हा सुरू झाला; मात्र पलिकडून पोलिसांनी उत्तर देत हेमंतचा मृत्यू झाल्याचे कळवले आणि कुटुंबीयांना इंदूर येथील एम.जी. रोड पोलीस ठाण्यात बोलावले. विवेक उर्फ विक्की शिंदे नावाच्या मांत्रिकाच्या सांगण्यावरून पैशाचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा करण्यात आल्याचा आणि त्यातूनच हेमंतचा नरबळी दिल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. याबाबत हेमंतच्या भावाने अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून इंदूर येथील एम.जी. रोड पोलीसही या प्रकरणाचा तपास करत आहेत. हेमंतला इंदूरला कोणी नेले, अघोरी पूजेचा या मृत्यूशी संबंध आहे का आणि नरबळीच्या आरोपात कितपत तथ्य आहे, याचा उलगडा पोलीस तपासानंतरच होणार आहे.





