अमरावती-नागपूर बसमधून तरुणी बेपत्ता

कोतवाली पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल

अमरावती /19 नोव्हेंबर- आईला भेटण्यासाठी अमरावतीहून एसटी बसने नागपूरकडे निघालेली 19 वर्षीय तरुणी प्रवासादरम्यान अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. नागपूरला पोहोचण्यापूर्वीच ती बेपत्ता झाल्याने तिच्या आईने अपहरणाचा संशय व्यक्त केला असून, कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे. कृष्णा असे या तरुणीचे नाव असून, ती मध्य प्रदेशातील पंदरी गावची रहिवासी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा ही 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता अमरावती येथील एसटी बसस्थानकातून नागपूरला जाण्यासाठी बसमध्ये बसली होती. नागपूर येथे आईकडे जाण्यासाठी ती घरातून निघाली होती. मात्र, बराच वेळ होऊनही ती नागपूरला पोहोचली नाही. त्यामुळे तिच्या आईला चिंता वाटू लागली. त्यांनी नातेवाइकांकडे आणि ओळखीच्या ठिकाणी तिचा शोध घेतला. मात्र, कुठेही तिचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर कृष्णाच्या आईने नागपूर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. प्रवासादरम्यान रस्त्यातच कोणीतरी तिचे अपहरण केले असावे, असा संशय त्यांनी तक्रारीत व्यक्त केला आहे. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 140 (3) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. बेपत्ता कृष्णाने हिरव्या रंगाचा सलवार-सूट परिधान केला असून, तिला केवळ हिंदी भाषा समजते. तिच्याबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास कोतवाली पोलीस ठाण्याच्या 0721-2672010 या क्रमांकावर किंवा पोलीस उपनिरीक्षक रंगराव जाधव यांच्या 9823879241 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Back to top button