चोरीच्या सहा घटनांचा छडा लावण्यात पोलिसांना यश
अल्पवयीन मुलाकडून सहा घरफोड्यांची कबुली

83 हजारांची रोकड आणि बुलेटसह आयफोन जप्त
अमरावती /19 नोव्हेंबर- शहरात घरफोडी करून नागरिकांना हैराण करणार्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. या मुलाने नागपुरी गेट आणि गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या 6 घरफोड्यांची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी त्याच्याकडून 83 हजार रुपयांची रोकड, बुलेट दुचाकी, आयफोन, चांदीची 5 नाणी आणि टायटन कंपनीचे घड्याळ असा मुद्देमाल जप्त केला आहे. पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलिंग सुरू असताना पोलिसांना एक अल्पवयीन मुलगा संशयास्पद स्थितीत दिसून आला. हा मुलगा घरफोडीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपल्या मामासमोरच चोरीच्या सहा घटनांची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईमुळे शहरातील घरफोडीच्या सहा घटनांचा उलगडा झाला असून, चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलाचा सहभाग समोर आला आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त यशवंत सोळंके, श्याम घुगे, प्रांजली सोनवणे, सहायक आयुक्त निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत निरीक्षक दिनेश दहातोंडे, अतुल वर, पोलीस उपनिरीक्षक दशरथ आडे, सचिन माकोडे, अंमलदार फिरोज खान, संभाजी केंद्रे, मंगेश लोखंडे, संजय भारसाकळे, सचिन भोयर, रणजीत गावंडे, नरेश मोहरील, सूरज चव्हाण, सागर ठाकरे, निखिल गेडाम, चेतन शर्मा आणि प्रभात पोकळे यांनी सहभाग घेतला.





