18 हजार गावात जलयुक्त शिवार योजना राबविणार
तिसरा टप्प्याच्या योजनेला मंजुरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
मुंबई/19 नोव्हेंबर : राज्य सरकारची महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना तिसर्या टप्प्यात राबविण्यात येणार असून, त्यासाठी 18 हजार गावांची निवड करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार 3.0, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, मनरेगा तसेच इतर योजनांमधील निधी आणि कामांचे एकत्रिकरण करून जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्यात येतील. या कामांचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन, मॅपिंग आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (19 नोव्हेंबर) दिली.
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे जलशक्ती अभियान (जलसंचय: जनभागिदारी 3.0) राबविण्याबाबत आज बैठक झाली. या बैठकीत वर्षा या शासकीय निवासस्थान येथून मुख्यमंत्री फडणवीस सहभागी झाले होते. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली.
पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवून भूजल पातळी वाढविणे, जुन्या जलसंधारण संरचनांचे पुनरुज्जीवन करणे आणि नव्या संरचनांची निर्मिती करणे, यासाठी राज्य सरकारने व्यापक कृती आराखडा तयार केला आहे. केंद्र शासनाच्या जलसंचय : जनभागीदारी अभियानांतर्गत राज्यात मे 2027 पर्यंत 34 लाख 83 हजार 940 भूजल पुनर्भरण संरचनांची निर्मिती पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि निश्चित उद्दिष्टानुसार काम करावे,असे निर्देश फडणवीस यांनी बैठकीत दिले.
राज्यातील जवळपास 90 टक्के भाग दुष्काळाच्या झळा सोसत असून, पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. या संकटाचे संधीत रूपांतर करण्याच्या दृष्टीने जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे.





