नागपुरात शांतीनगरातून 3 कोटींची रोकड लुटली
दरोडेखोरांनी पळवलेली कार सापडली

* आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना
नागपूर/18 नोव्हेंबर- सुरक्षित शहर असा दावा करीत असतानाही नागपूर शहरातील शांतिनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुलसीनगर परिसरात मंगळवारी मध्यरात्री 3 कोटी 75 लाख रुपयांची मोठी लूट झाल्याने खळबळ उडाली आहे. पाच ते सहा लुटारूंनी चाकूचा धाक दाखवून व्यापार्याच्या वाहनचालकाकडील रोकड लुटली. यावेळी लुटारूंनी घरासमोरील सुरक्षारक्षकावर चाकूने वार करून त्याला जखमी केले, तर चालकाला जीवे मारण्याची धमकी देत रोकड असलेली कारच पळवून नेली. त्यानंतर आरोपींनी कामठी-खैरी परिसरात कार सोडून दिली आणि त्यातील रोकड घेऊन पसार झाले. पोलिसांनी लुटारूंनी पळवून नेलेली कार जप्त केली आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरेश परमार असे नागपुरात राहणार्या व्यापार्याचे नाव आहे. ते गेल्या सहा महिन्यांपासून तुलसीनगर परिसरात भाड्याच्या घरात वास्तव्यास आहेत. त्यांचा भाऊ सोहन परमार हा मूळचा जालना येथील असून, तो फायनान्सचा व्यवसाय करतो. लुटण्यात आलेली रोकड सोहन परमार यांची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुरेश परमार हे नागपुरातील त्यांचा व्यवसाय सांभाळत होते. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री उशिरा वाहनचालक मोहन राव हा कारमधून कोटींची रोकड घेऊन जालनासाठी रवाना झाला होता. तुलसीनगर परिसरात घराजवळच असताना तीन ते चार अज्ञात लुटारूंनी दुसर्या कारने त्याचा पाठलाग केला. काही अंतरावर कार आडवी केली. अचानक वाहन आडवे आल्याने चालकाने कार थांबवली. आरोपींनी कारमधून उतरुन थेट चाकू चालकाच्या गळ्याला लावला. दरम्यान, घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता लुटारूंनी त्याच्यावर चाकूने वार केले. त्यात तो जखमी झाला. त्यानंतर आरोपींनी चालक मोहन राव याच्या गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याला कारमधून खाली उतरवले आणि रोकड असलेली कार घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. कारमध्ये ठेवलेल्या बॅगेत 3 कोटी 74 लाख रुपयांची रोकड होती. लुटीनंतर आरोपी नागपूर जिल्ह्यातील कामठी-खैरी परिसरात पोहोचले. तेथे त्यांनी कार सोडून दिली. मात्र, कारमधील रोकड असलेली बॅग घेऊन ते पसार झाले. घटनेची माहिती मिळताच शांतिनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी खैरी परिसरातून कार जप्त केली असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड कुठून आली?, ती कुठे नेली जात होती? आणि तिचा नेमका स्रोत काय?, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
टीप देऊन लुट?
या लुटीमध्ये कुणी ओळखीचा व्यक्ती आरोपींशी जुळलेला असण्याची शक्यता आहे. कुणीतरी जवळच्या व्यक्तीने टीप देऊन लुट केल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. आरोपींना रोकडच्या वाहतुकीची आधीपासून माहिती होती का?, त्यांनी घटनास्थळाची रेकी केली होती का? आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचाही तपास केला जात आहे.





