शाळेची दूरवस्था पाहून गटशिक्षणाधिकारी स्तब्ध

प्राचार्य रजेवर, शिक्षकांनी दिले माफीनामे

-शैक्षणिक अधोगतीला जबाबदार कोण?
नांदगाव पेठ / 3 जुलै : जिल्हा परिषद माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय येथे नुकतेच गटशिक्षणाधिकारी वानखडे यांनी भेट दिली. मात्र शाळेची दयनीय अवस्था बघून गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख सुद्धा काही वेळ स्तब्ध झाले. वर्ग खोल्यांची दूरवस्था, मैदानाची दुर्दशा तसेच शिक्षणाचा झालेला बट्ट्याबोळ बघून थेट गटशिक्षणाधिकारी यांनाच शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. गटशिक्षणाधिकार्‍यांच्या दौर्‍यावेळी सुद्धा प्राचार्य देवेंद्र ठाकरे हे रजेवर होते. तर पालकांनी शिक्षक आणि प्राचार्य यांच्या मनमानी कारभारावर संताप व्यक्त केला.
माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन हटवार यांनी केलेल्या सुचनेनुसार गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख यांनी शाळेची संपूर्ण पाहणी केली. यामध्ये शाळेला प्राप्त झालेल्या देखभाल व दुरुस्तीच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता असल्याच्या बाबी उघडकीस आल्या. वर्ग खोल्यांची परिस्थिती, शौचालये, स्वच्छता, मैदान आदी बाबतीत दुर्दशा स्पष्टपणे दिसून आली. प्राचार्य देवेंद्र ठाकरे हे रजेवर असल्यामुळे शाळेच्या प्रशासनाची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली जात नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शिक्षकांची अनुपस्थिती व वेळेचे भान नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत असल्याचे स्पष्ट झाले.
शाळेतील सर्व शिक्षकांची पेशी घेऊन त्यांना शैक्षणिक कामाप्रती हयगय खपवून घेतल्या जाणार नाही, असे गटशिक्षणाधिकारी वानखडे यांनी सुनावले. तसेच झालेल्या चुकांबद्दल शिक्षकांनी माफीनामा लिहून देत यापुढे कोणत्याही प्रकारची तक्रार येणार नाही असे आश्वस्त केले. गटशिक्षण अधिकारी व केंद्र प्रमुखांनी याबाबत गंभीर दखल घेतली असून संबंधितांची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी सरपंच कविता डांगे, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद डांगे, अभिजित बानासुरे, मनोज मोरे, अरुण राऊत आदी पालक वर्ग उपस्थित होते.
शाळेच्या सर्वांगीण विकासाकरिता गावातील पालकांनी तसेच मान्यवरांनी शाळेला आर्थिक मदत केलेली आहे मी सुद्धा शालेय साहित्य करिता पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केलेली आहे. मात्र ती मदत खरोखर विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली की नाही हा संशोधनाचा विषय आहे. वरिष्ठांनी महाविद्यालयाचे विशेष लेखा परीक्षण करावे, तसेच आर्थिक बाबींची चौकशी करावी. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य नीतीन हटवार यांनी केली.
या सर्व घडामोडींमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा दुष्परिणाम पाहता, पालक वर्गामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शाळेच्या व्यवस्थापनात पारदर्शकता यावी, शिक्षकांनी नियमितपणे उपस्थित राहावे, निधीचा योग्य वापर व्हावा अशी मागणी जोर धरत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button