चारही आरोपींच्या कोठडीत 14 मार्चपर्यंत वाढ
साडेसात कोटींचे ड्रग्ज प्रकरण

* अमली पदार्थ जप्ती प्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय
* तपासाचे चक्र फिरले तरी सूत्रधार अजूनही मोकाट
अमरावती / 4 मार्च : राज्याच्या उपराजधानीसह विदर्भाला हादरवून सोडणार्या साडेसात कोटी रुपयांच्या ’एमडी’ ड्रग्ज तस्करी प्रकरणात अडकलेल्या चारही आरोपींना पुन्हा एकदा न्यायालयाचा दणका बसला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) नागपूर चमूने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या गुन्हेगारांना अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने आरोपींच्या कोठडीत 14 मार्चपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले असून, तस्करीच्या या काळ्या बाजाराने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 1 फेब्रुवारी रोजी ’ऑपरेशन हिंटरलँड ब्लू’ अंतर्गत करण्यात आलेल्या या धडक कारवाईत 4 किलो 900 ग्रॅम वजनाचा उच्च प्रतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात फैजल खान अन्सार खान (वय 22, रा. गुलिस्ता नगर), शेख परवेज शेख नासिर (वय 32, रा. रतनगंज), जावेद अहमद आरिफ अहमद (वय 25) आणि मुस्तकीम खान अब्दुल ताहेर खान (वय 29, दोन्ही रा. कसाबपुरा, चांदूर बाजार) या चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या तस्करीचे धागेदोरे थेट गुजरातच्या अहमदाबादपर्यंत जुळले असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या मालाची किंमत 7 कोटी 35 लाख रुपये इतकी अवाढव्य आहे. विशेष म्हणजे, तपासी यंत्रणेने यावेळेस आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली नाही, त्यामुळे त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या कारवाईसाठी ’डीआरआय’च्या पथकाने अमरावतीतील नवसारी परिसरात सापळा रचून कारमधून जाणार्या या तस्करांना जेरबंद केले होते. तपासादरम्यान नागपूर, वर्धा आणि अमरावतीमधील अनेक संशयास्पद ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. मात्र, पकडलेले हे चौघेही केवळ ’कुरियर’ म्हणून काम करणारे साखळीतील छोटे दुवे असल्याचे समोर येत आहे. या महाभयंकर अमली पदार्थांच्या जाळ्याचा खरा ’मास्टरमाइंड’ आणि पडद्यामागचा खरा खेळाडू अद्यापही तपास यंत्रणेच्या हातावर तुरी देऊन मोकळाच फिरत आहे. या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असून मुख्य आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान आता यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.
तस्करीचा मुख्य सुत्रधार पडद्याआडच-साडेसात कोटींच्या या महाप्रकरणात पकडलेले तरुण हे केवळ मालाची रखवाली करणारे आणि पोहोचवणारे ’प्यादे’ असल्याचे निष्पन्न झाले आहे. या आंतरराष्ट्रीय रॅकेटची सूत्रे हलवणारा मुख्य माफिया अद्यापही पोलिसांच्या नजरेपासून दूर आहे. जोपर्यंत या रॅकेटचा खरा म्होरक्या हाती लागत नाही, तोपर्यंत अमरावती आणि विदर्भातील अमली पदार्थांची ही जीवघेणी तस्करी थांबवणे कठीण असल्याचे बोलले जात आहे.




