संघर्ष माझ्या पाचवीलाच पुजलेला…
राज्यसभेची उमेदवारी नाकारल्याने नवनीत राणा भावूक

* दिग्गजांना डावलून सामाजिक गणितावर भर
* राणा समर्थकांमध्ये कमालीची अस्वस्थता
* पक्षांतर्गत वादाचा बसला मोठा फटका
अमरावती /4 मार्च : राज्यसभेच्या रणांगणात कुणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर भाजपने धक्कातंत्राचा वापर करत महाराष्ट्रातील चार नावांची घोषणा केली, पण त्यात अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांचे नाव गायब असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अनेक दिग्गज नेते प्रतीक्षायादीत असताना पक्षाने ’सामाजिक अभियांत्रिकी’चा नवा प्रयोग केला असून, यामुळे नवनीत राणांच्या समर्थकांचा पुरता हिरमोड झाला आहे. उमेदवारी नाकारल्याचे समजताच नवनीत राणा भावूक झाल्या, मात्र संघर्ष माझ्यासाठी नवा नाही, मी कुठल्याही वळणावरून नवी सुरुवात करू शकते, अशा शब्दांत त्यांनी सोशल मीडियावर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बळवंत वानखडे यांच्याकडून पराभव पत्करावा लागल्यानंतरही नवनीत राणा राजकारणात कमालीच्या सक्रिय होत्या. त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपसाठी गावखेड्यात रान पेटवले होते. अमरावती लोकसभा मतदारसंघातून 2019 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नवनीत राणा यांनी 2024 च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला होता. त्यावेळी जिल्ह्यातील भाजप नेते, कार्यकर्ते आणि महायुतीच्या मित्रपक्षांचा तीव्र विरोध असतानाही पक्षश्रेष्ठींनी त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र, पोटनिवडणुकीत पराभूत होऊनही त्या संसदेत जाण्यास उत्सुक होत्या. आता राज्यसभेची संधी हुकल्याने त्यांच्या राजकीय भविष्याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
अमरावती जिल्ह्यातून आधीच डॉ. अनिल बोंडे राज्यसभेत प्रतिनिधीत्व करत असल्याने, एकाच जिल्ह्यातून दोन खासदारांना संधी देणे पक्षाला तांत्रिकदृष्ट्या जड गेल्याचे दिसते. याशिवाय, भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि स्थानिक नेत्यांशी असलेला टोकाचा संघर्ष नवनीत राणा यांना नडला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे आणि नवनीत राणा यांच्यातील वाद जिल्ह्याला नवा नाही. त्यातच, महापालिका निवडणुकीत भाजपच्या 13 उमेदवारांच्या पराभवासाठी नवनीत राणा यांनी पडद्यामागून हालचाली केल्याचा आणि आमदार रवी राणा यांच्या ’युवा स्वाभिमान’ पक्षाला मदत केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांकडे केला होता.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हनुमान चालिसेचा मुद्दा गाजवून नवनीत राणा यांनी देशपातळीवर लक्ष वेधून घेतले होते. त्या सातत्याने माजी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत भाजपची पाठराखण करत आल्या आहेत. तरीही, स्थानिक पातळीवरील तक्रारींचा पाढा आणि पक्ष संघटनेतील नाराजी यामुळे अखेर दिल्लीश्वरांनी नवनीत राणा यांचा पत्ता कट केल्याचे बोलले जात आहे. आता या धक्कादायक निर्णयामुळे राणा दाम्पत्य कोणती नवी भूमिका घेणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
पक्ष कार्यकर्त्यांच्या तक्रारींचा पाढा ठरला घातकी
नवनीत राणा यांना डावलण्यामागे भाजपमधील स्थानिक नेत्यांचा तीव्र विरोध मुख्य कारणीभूत असल्याचे बोलले जाते. भाजपचे दिग्गज नेते प्रवीण पोटे यांच्याशी असलेला जुना वाद आणि गेल्या काही निवडणुकांमध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात घेतलेली छुपी भूमिका, यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. हीच नाराजी पक्षश्रेष्ठींनी अत्यंत गांभीर्याने घेतली आणि अखेर नवनीत राणा यांचा दिल्लीचा मार्ग तूर्तास रोखला गेल्याची चर्चा अमरावतीच्या गल्लीबोळात सुरू आहे.




