नरभक्षक वाघिणीच्या मृत्यूनंतर सोनोरीत चौकशीचा ससेमिरा

वनविभागाच्या संशयास्पद कार्यपद्धतीवर वरिष्ठ पातळीवर तपास, पोलीसांच्या वारंवार चौकशीमुळे सोनोरी ग्रामस्थ त्रस्त

चांदूर बाजार/17 नोव्हेंबर – चार जणांचा बळी घेणार्‍या नरभक्षक वाघिणीच्या मृत्यूनंतर वनविभागाचे अधिकारी आणि सोनोरी गावातील रहिवासी अशा दोघांच्याही अडचणी वाढल्या असून वरिष्ठ पातळीवरून वाघिणीच्या मृत्यूचा सखोल तपास सुरू झाला आहे तर दुसरीकडे सरकारी वाहनाच्या तोडफोड प्रकरणात पोलीस चौकशीसाठी वारंवार बोलावित असल्याने गावकरी पुरते त्रस्त झाले आहेत. परतवाडा वनपरिक्षेत्रांतर्गत चांदूर बाजार तालुक्यातील सोनारी गावात 6 सप्टेंबर रोजी उर्मिला इवने या तरुणीवर वाघिणीने हल्ला करूनतिचा बळी घेतला होता. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला होता आणि जमावाचा रोष वनविभागाच्या कर्मचार्‍यांना सहन करावा लागला. याच गोंधळात जमावातील अज्ञात व्यक्तींनी वनविभागाच्या वाहनाच्या काचा फोडल्या होत्या. याप्रकरणी वनविभागाने चांदूर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलीसांनी चित्रफितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला आहे. चौकशीसाठी वारंवार ठाण्यात बोलावले जात असल्याने गावकर्‍यांमध्ये मोठी नाराजी असून त्यांनी लोकप्रतिनिधींकडे आपली व्यथा मांडली आहे.दरम्यान वाघिणीला ठार मारण्याचे कोणतेही अधिकृत आदेश नसताना तिचा मृत्यू झाल्याने या संपूर्ण प्रकरणात वनअधिकार्‍यांची भूमिका संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. या तपासात अनेक गंभीर त्रुटी समोर आल्याची माहिती मिळत आहे. चार जणांचा बळी घेणारी ही वाघीण भुकेली असल्याची बाब उघड झाली असून तिला बेशुद्ध करण्यासाठी दिलेल्या सुईच्या मात्रेबाबत आणि विषाणूभूल प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या घटनेशी संबंधित काही चित्रफिती समाज माध्यमांवर पसरल्या असून त्या तपास अधिकार्‍यांच्या हाती लागल्या आहेत. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर या प्रकरणाची कसून चौकशी सुरू झाली आहे. एका बाजूला वाघिणीच्या मृत्यूमुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले जात आहेत तर दुसरीकडे सोनारीतील नागरिक पोलीस चौकशीच्या फेर्‍यात अडकल्याने त्रस्त झाले आहेत.

Back to top button