ट्रकने 25 वाहनांना उडवले, 15 प्रवासी गंभीर
समृद्धी महामार्गावर विचित्र अपघात

मदतीसाठी माजी मंत्री राजेश टोपे यांचा पुढाकार
बुलढाणा /13 नोव्हेंबर : समृद्धी महामार्गावर लहान आणि मोठे अपघात हे समीकरण लोकार्पणापासून जुळले आहे. मात्र आज (13 नोव्हेंबर) समृद्धी मार्गावर एक विचित्र अपघात झाला. बुलढाणा जिल्ह्यातून जाणार्या समृद्धी महामार्गावर दुसरबीडजवळ झालेल्या एका साखळी अपघातात ट्रकने तब्बल 25 वाहनांना उडवलं. या अपघातात 8 ते 10 वाहने एकमेकांवर आदळली. त्यामुळे अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. महत्त्वाचे म्हणजे माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे हे अपघातावेळी प्रत्यक्ष त्याठिकाणी उपस्थित होते.
समोर आलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साधारण साडे दहा दरम्यान सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड जवळ अपघातग्रस्त सिमेंट मिक्सर पलटी झाला होता. त्यामुळे सदर वाहन बाजूला काढण्याचे काम सुरू होते. यावेळी महामार्गावरून जाणारी वाहतूक काही काळ थांबवण्यात आल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र त्याचवेळी मागून वेगाने ट्रक आला आणि त्याने उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकने तब्बल 25 वाहनांना उडवलं. यावेळी 8 ते 10 वाहने एकमेकांवर आदळली. त्यामुळे वाहनात बसलेले 15 प्रवाशी गंभीर जखमी झाले, तर 20 प्रवाशी किरकोळ जखमी झाले. अपघात झाल्यावर समृद्धी महामार्ग प्रशासनानं तत्काळ मदत कार्य सुरू करून वाहनात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान वाहतूक सुरळीत करण्यात आली असून अपघाताच्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या राजेश टोपे यांनी अपघाताची माहिती दिली आहे.राजेश टोपे यांनी सांगितले की, लग्न समारंभासाठी मी नागपूरला गेलो होतो, मात्र परतीचा प्रवास करत असताना साधारण साडेदहा अकरा वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. एक मिक्सरची ट्रॉली पलटी झालेली होती आणि त्या ट्रॉलीमुळे मुंबईकडे जाणारा रोड ब्लॉक झालेला होता. त्यामुळे भरपूर वाहने लाईनमध्ये थांबली होती. मात्र त्याचवेळी पाठीमागून एक स्टीलचा ट्रक भरधाववेगात आला. मात्र चालकाला ट्रकवर अजिबात कंट्रोल करता आले नाही आणि त्याने मागच्या सगळ्या वाहनांना धडक दिली. माझी गाडी ज्या ठिकाणी उभी होती, त्याच्या अगदी बाजूलाच उभ्या असलेल्या गाडीला देखील पाठीमागून धडक दिली, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.





