मुंबई महापालिकेत बॉम्ब ठेवल्याची पुन्हा धमकी

बॉम्ब शोधक-नाशक पथक दाखल

पुणे महापालिकेलाही धमकीचा ई-मेल

मुंबई /12 नोव्हेंबर: महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा ईमेल आला आहे. यामध्ये मुंबईतील बँक, कोर्ट, अभिनेता अमिताभ बच्चन यांचा बंगला, मुंबईच्या महापौरांचे कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, महालक्ष्मी रेसकोर्स, सीएसएमटी बस स्थानक अशा महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पाठोपाठ पुणे महापालिकेत बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल आला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे. धमकीच्या ई-मेलमध्ये मुंबई महापालिकेचा देखील उल्लेख असल्याने महापालिकेतील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. सुरक्षा यंत्रणांनी मुंबई महापालिका परिसरात तपासणी केली. यावेळी काहीही संशयास्पद सापडलेलं नाही. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने धमकीचे मेल येत आहेत. याआधी देशभरातील विविध कोर्टात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल आला होता. तसेच मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बने उडवून देण्याची धमकी याआधीदेखील ई-मेलद्वारे देण्यात आली होती. काही असामाजिक घटकांकडून अशाप्रकारचे मेल केले जात आहेत. या अशाप्रकारच्या ई-मेल नंतर प्रशासनाची धावपळ होते. सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून सर्वोतोपरी काळजी घेतली जाते आणि तपासणी केली जाते. मुंबईत ज्या ठिकाणी बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली तिथे सुरक्षा यंत्रणांनी तपासणी केली असता कोणत्याही संशयास्पद गोष्टी आढळलेल्या नाहीत. पण अशा ई-मेलमुळे प्रशासनात खळबळ उडते. तसेच सुरक्षा यंत्रणांकडून तपासणी केली जात असताना नागरिकांमध्येदेखील भीती निर्माण होते. संबंधित मेल कुणी पाठवला आहे, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण पोलिसांकडून या प्रकरणी काय-काय कारवाई केली जाते ते पाहणं महत्त्वाचं आहे.

Back to top button