यंदा फटाक्यांच्या विक्रीत मोठी घट

दुष्काळाचा फटका दिवाळीच्या बाजारपेठेलाही, शहरात 21 कोटींच्या विक्रीचा अंदाज

अमरावती /10 नोव्हेंबर- दिवाळीत दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणार्‍या फटाक्यांच्या बाजारपेठेला यंदा दुष्काळाचा मोठा फटका बसला. शेतकर्‍यांच्या हातात पैसा कमी आल्याने नागरिकांनीही फटाके खरेदी करताना हात आखडता घेतला. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा फटाक्यांच्या विक्रीत 30 ते 40 टक्क्यांची घट नोंदविण्यात आली. यंदाच्या दिवाळीत शहरात सुमारे 21 कोटी रुपयांची विक्री होण्याचा अंदाज असून, बाजारात मोठ्या फटाक्यांपेक्षा लहान फटाक्यांना अधिक मागणी राहिली.
शहरातील 400 हून अधिक विक्रेत्यांनी यंदा सुमारे 65 कोटी रुपयांचा माल बाजारात आणला होता. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अनेक विक्रेत्यांचा माल शिल्लक राहण्याची शक्यता निर्माण झाली. दिवाळी आणि फटाके यांचे अतूट नाते असून, या काळात बाजारपेठेत मोठी उलाढाल होते. मात्र, यंदा सुरुवातीपासूनच फटाके विक्रेत्यांमध्ये विक्रीबाबत चिंता होती. दसर्‍यानंतर दिल्लीतील वाढत्या वायुप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांवर निर्बंध येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली होती. मात्र, न्यायालयाने फटाक्यांवर सर्वसाधारण बंदी घालण्यास नकार दिला. त्यानंतर राज्यातील फटाके विक्रेत्यांच्या परवान्यांच्या नूतनीकरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. दिवाळी लक्षात घेता जिल्ह्यातील 300 हून अधिक विक्रेत्यांना परवाना नूतनीकरण होईपर्यंत व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली. या परिस्थितीमुळे अनेक विक्रेत्यांनी सुरुवातीला मर्यादित माल मागविला. शहरातील गांधी चौकातील ठाकूर फटाका भांडारचे संचालक रुद्रपाल सिंह ठाकूर यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबाचा हा व्यवसाय 1952 पासून सुरू असून, गेल्या 73 वर्षांपासून ते या व्यवसायात आहेत. सुरुवातीला गांधी चौकात एकाच दुकानातून व्यवसाय सुरू झाला. आज शहरात लहान-मोठी मिळून 400 हून अधिक दुकाने आहेत. फटाके तयार करण्यासाठी 150 ते 200 प्रकारच्या रसायनांचा वापर होतो. त्याचबरोबर सुतळी, कागद आणि इतर साहित्याच्या दरात वाढ झाल्याने दरवर्षी फटाक्यांच्या किमतीत 10 ते 12 टक्क्यांनी वाढ होते. यंदा चकरी, अनार, फुलबाज्या, सुतळी बॉम्ब आणि इतर लहान फटाक्यांना अधिक मागणी होती. मात्र, नागरिकांनी गरजेपुरतीच खरेदी केल्याने बाजारपेठेतील अपेक्षित उलाढाल होऊ शकली नाही. यंदा शेतकर्‍यांच्या हातात पैसा कमी असल्याने दिवाळीच्या खरेदीवरही त्याचा परिणाम दिसून आला. शेतमालाला चांगला भाव मिळाल्यास ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात खरेदी होते. मात्र, यंदा ती उत्साहवर्धक नव्हती. त्यामुळे फटाके विक्रेत्यांना अपेक्षित व्यवसाय करता आला नाही. शहरातील फटाक्यांच्या बाजारपेठेत यंदा मोठ्या फटाक्यांपेक्षा कमी किमतीच्या वस्तूंना अधिक पसंती मिळाल्याचे चित्र दिसून आले.

Back to top button