एसडीपीओ मनिष ठाकरे यांच्या मुलावर दोनवेळा हल्ला
रस्ता दुर्घटनेवरून चाकूबाजी

10 हजार रुपयांच्या मागणीवरून वाद विकोपाला
अमरावती /10 नोव्हेंबर- राठी नगर परिसरात किरकोळ वाहन धडकेचा वाद थेट चाकूहल्ल्यापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली. दुचाकीची कारला धडक बसल्यानंतर दुचाकीस्वार तरुणांनी साथीदारांना बोलावून कारमधील 3 तरुणांकडे 10 हजार रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी चाकूने हल्ला केला. यात ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांचा मुलगा पार्थ ठाकरे (22) गंभीर जखमी झाला. एवढ्यावरच न थांबता 6 तरुणांनी जखमी पार्थ आणि त्याच्या मित्रांचा जिल्हा रुग्णालयापर्यंत पाठलाग करून तेथेही पैशांसाठी धमकावले. या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास पार्थ ठाकरे हा आपल्या 2 मित्रांसह शेगावहून पंचवटीकडे जाणार्या मार्गावर डॉमिनोज प्लाझाजवळ कारमध्ये बसला होता. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला मागून दुचाकीची धडक बसली. यामुळे दुचाकीवरील तरुण खाली पडला. त्यानंतर त्यांनी साथीदारांना बोलावून कारमधील तिघांना घेरले आणि 10 हजार रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार मिळताच शिवीगाळ करून चाकूने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात पार्थच्या दोन्ही हातांना जखमा झाल्या. त्याने मित्रांसह जिल्हा रुग्णालय गाठले. मात्र, दुचाकींवरून आलेल्या तरुणांनी तेथेही पाठलाग केला. यावेळी स्वतःला विलासनगरचा भाऊ म्हणवणार्या राहुल नावाच्या तरुणाने पुन्हा पैशांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली. चाकूने पार्थच्या मानेवर वार करण्याचाही प्रयत्न झाला. त्याने बचावासाठी हात पुढे केल्याने दोन्ही हातांना दुखापत झाली. पोलिस येत असल्याची चाहूल लागताच हल्लेखोर पसार झाले. पार्थने गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.





