साडेचार कोटी खर्चूनही शहरात अस्वच्छता
ठेकेदारांच्या दुर्लक्षपणामुळे नागरिकांमध्ये रोष

कचरा उचलण्याऐवजी ढिगांना लावली जाते आग
अमरावती/10 नोव्हेंबर – शहर स्वच्छ ठेवण्याच्या नावाखाली महापालिकेने कचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटदाराला दिवाळीपूर्वी तब्बल 4 कोटी 50 लाख रुपयांची थकीत देयके अदा केली. मात्र, एवढा मोठा खर्च करूनही शहरातील स्वच्छतेचा प्रश्न कायम असून, प्रमुख रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी कचर्याचे ढीग साचले आहेत. सात वर्षांसाठी पाचही विभागांतील स्वच्छतेची जबाबदारी दिलेल्या कंपनीकडून अपेक्षित काम होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. विशेष म्हणजे, कचरा उचलण्याऐवजी त्याला आग लावण्याचे प्रकार समोर येत असल्याने धुराच्या प्रदूषणातून नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत आहे.
महापालिकेने प्रशासकीय कारभारात शहराच्या स्वच्छतेचे सात वर्षांचे कंत्राट खासगी कंपनीला दिले आहे. मात्र, कंपनीकडून निविदेतील अटींची पूर्तता होत नसल्याच्या तक्रारी आहेत. या निविदा प्रक्रियेवर उच्च न्यायालयानेही प्रश्न उपस्थित केले होते. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, अंतिम निर्णय होईपर्यंत संबंधित कंपनीकडेच स्वच्छतेची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.
शहरातील रेल्वे स्थानक मार्गावरील शासकीय ग्रंथालयाच्या इमारतीसमोर साचलेल्या कचर्याला आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे. कचरा जाळल्याने परिसरात धूर पसरत असून, हवेचे प्रदूषण वाढण्याची भीती आहे. कंत्राटदाराची थकीत देयके मिळत नसल्याने कामात अडथळे येत असल्याचे सांगितले जात होते. ही अडचण दूर करण्यासाठी महापालिकेने ऑक्टोबरपर्यंतची सुमारे 4 कोटी 50 लाख रुपयांची रक्कम दिली. तरीही गोळा केलेला कचरा खतनिर्मिती केंद्रापर्यंत पोहोचत नसल्याने अनेक भागांत ढिगारे वाढत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करूनही शहराची स्वच्छता होत नसेल तर या कामावर देखरेख कोण ठेवणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.





