दिवाळीच्या सुट्यांनी क्रीडांगणे ओस

खेळाडूंची संख्या घटली, मैदानांवर शुकशुकाट

नोव्हेंबरच्या उत्तरार्धात सराव पुन्हा सुरू

अमरावती/10 नोव्हेंबर- दिवाळीच्या सणामुळे शहरातील क्रीडा क्षेत्रातील हालचाली मंदावल्या असून, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, बॅडमिंटन आणि धावण्याच्या सरावावर परिणाम झाला आहे. शाळा-महाविद्यालयांच्या सुट्या, खेळाडूंचे गावाकडे जाणे आणि कौटुंबिक कार्यक्रमांमुळे शहरातील प्रमुख क्रीडांगणे ओस पडली आहेत. नियमित सराव करणार्‍या खेळाडूंची संख्या कमी झाल्याने मैदानांवर शुकशुकाट दिसत आहे. नोव्हेंबरच्या दुसर्‍या पंधरवड्यात खेळाडू पुन्हा मैदानावर परतण्याची शक्यता असून, डिसेंबरमधील स्पर्धांसाठी तयारीला वेग येणार आहे.
अमरावतीला क्रीडा क्षेत्राची मोठी परंपरा लाभली आहे. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने शहराला क्रीडा क्षेत्रात वेगळी ओळख मिळवून दिली आहे. येथे क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, बॅडमिंटन, मल्लखांब आणि धावण्याचा नियमित सराव होतो. मात्र, दिवाळीमुळे अनेक खेळाडू कुटुंबासोबत सण साजरा करण्यासाठी गावाकडे गेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी सराव तात्पुरता बंद आहे. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची मैदाने, बॅडमिंटन सभागृह, जलतरण तलाव, विद्याभारती महाविद्यालय, शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, संत गाडगेबाबा नगर, विमलताई देशमुख महाविद्यालय, व्हीएमव्ही, पोते शिक्षण समूह, जिल्हा क्रीडासंकुल, सायन्सकोर मैदान, दसरा मैदान, गणेशदास राठी विद्यालय, समर्थ हायस्कूल आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरातही खेळाडूंची वर्दळ कमी झाली आहे. मोर्शी मार्गावरील जिल्हा क्रीडासंकुलासह विद्यापीठ परिसर आणि सायन्सकोर मैदानावरील चालण्याच्या मार्गांवरही गर्दी घटली आहे. काही धावपटू घरच्या घरी व्यायाम करीत आहेत. डिसेंबरमधील स्पर्धा लक्षात घेता नोव्हेंबरच्या उत्तरार्धात सरावाला पुन्हा वेग येण्याची अपेक्षा आहे.

दिवाळीनंतर पुन्हा मैदानांवर रंगत

डिसेंबरमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन प्रस्तावित असल्याने खेळाडूंना सरावासाठी फारसा वेळ मिळणार नाही. त्यामुळे सुट्या संपताच नियमित सराव सुरू करावा लागणार आहे. सध्या मिळालेली विश्रांती खेळाडूंना कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी देत असली, तरी आगामी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी पुन्हा मेहनत घ्यावी लागणार आहे.

 

Back to top button