जबरीने मोबाईल हिसकावणारा तरुण जेरबंद

30 हजारांचा आयफोन पोलिसांनी केला जप्त

अमरावती /10 नोव्हेंबर- बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीला धमकावून त्याचा मोबाईल जबरीने हिसकावून नेल्याच्या प्रकरणात अमरावती गुन्हे शाखेने 20 वर्षीय आरोपीला अटक केली. प्रतीक विनोद कैथवास असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून सुमारे 30 हजार रुपये किमतीचा पांढर्‍या रंगाचा पल आयफोन जप्त करण्यात आला. मोबाईल विकण्याच्या उद्देशाने आरोपी 10 नोव्हेंबर रोजी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऑक्सिजन पार्क परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.बडनेरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 309 (4) आणि 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक अतुल वर्‍हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करीत होते. दरम्यान, गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, या घटनेतील आरोपी प्रतीक विनोद कैथवास (20, रा. माताफैल, बडनेरा) हा चोरीचा मोबाईल विकण्यासाठी ऑक्सिजन पार्क परिसरात येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ परिसरात सापळा रचला. काही वेळातच संशयित तरुण पायी येताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, काही दिवसांपूर्वी बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोविंद महाराज मंदिराजवळ एका व्यक्तीला धमकावून त्याच्याकडील मोबाईल जबरीने हिसकावल्याची कबुली त्याने दिली. त्याची झडती घेतली असता चोरीला गेलेला पांढर्‍या रंगाचा पल आयफोन पोलिसांना मिळाला.

Back to top button