धारणीत दुष्काळात हजारो लिटर पाण्याची नासाडी
पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही पंधरा दिवस उलटून कारवाई शून्य

धारणी /10 नोव्हेंबर- संपूर्ण राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असताना धारणी नगर पंचायतीच्या अजब कारभारामुळे टिगरिया रस्त्यावरील मुख्य पाणीपुरवठा यंत्रणेतून दररोज हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असून, नगरसेवक सुरज वासुदेव मालवीय यांनी तक्रार करून तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकार्यांना तत्काळ तोडगा काढण्याचे आदेश देऊनही पंधरा दिवसांत प्रशासनाने साधी दखल न घेतल्याने पाच प्रभागांतील नागरिकांवर ऐन उन्हाळ्यापूर्वी भीषण पाणीटंचाईचे सावट ओढवले आहे.
धारणी शहरात नगर पंचायतीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. एकीकडे संपूर्ण राज्यात गंभीर दुष्काळ जाहीर झालेला असताना दुसरीकडे धारणीत मात्र रोज हजारो लिटर पाणी गटारात वाहून जात आहे. नगर पंचायतीच्या अखत्यारीत येणार्या टिगरिया रस्त्यावरील मुख्य पाणीपुरवठा पंपाजवळ गेल्या वर्षभरापासून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती सुरू आहे. याच मुख्य पंपावरून प्रभाग क्रमांक 9, 14, 8, 15 आणि 16 अशा एकूण 5 प्रभागांना नियमित पाणीपुरवठा केला जातो. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पाणी पुरवणारी ही वाहिनी वर्षभरापासून फुटलेली असताना नगर पंचायत प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.
स्थानिक नगरसेवक सुरज वासुदेव मालवीय यांनी या गंभीर समस्येकडे नगर पंचायतीचे लक्ष वारंवार वेधले. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून केवळ दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करण्याचे पोकळ उत्तर देऊन वेळ मारून नेली जात आहे. एका वर्षाचा प्रदीर्घ कालावधी लोटूनही गळती दुरुस्त करण्यासाठी साधी हालचाल झालेली नाही. प्रशासनाच्या या बेफिकीर धोरणामुळे परिसरातील भूजल पातळी आत्तापासूनच झपाट्याने खाली जाऊ लागली आहे.अमरावती दौर्यावर आलेले जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना नगरसेवक सुरज वासुदेव मालवीय यांनी प्रत्यक्ष भेटून या भीषण पाणी गळतीची चित्रफीत दाखवली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकार्यांना तत्काळ निवारण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते.





