तपोवन परिसरात बिबट्याचा मुक्त संचार
कुत्र्याची शिकार करताना बिबट्या सीसीटीव्हीत कैद

परिसरातील नागरिकांमध्ये दहशत
अमरावती /9 नोव्हेंबर- तपोवन परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गंगोत्री नगर आणि सद्गुरू विहार परिसरात बिबट्या फिरताना दिसला असून, 5 नोव्हेंबर रोजी रात्री 11.40 वाजता त्याने संजय खडसे यांच्या घराच्या अंगणात बांधलेल्या कुत्र्याची शिकार केली. ही घटना घरातील सीसीटीव्ही चित्रणात कैद झाली. त्यानंतर 6 नोव्हेंबर रोजी पहाटे 4.34 वाजता राज्य राखीव पोलीस दलाच्या छावणी परिसरातही बिबट्या दिसल्याने जवानांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
संजय खडसे यांच्या घराच्या अंगणात शिरलेल्या बिबट्याने बांधलेल्या कुत्र्यावर हल्ला केला. या घटनेमुळे गंगोत्री नगर परिसरात घबराट पसरली आहे. दुसरीकडे, राज्य राखीव पोलीस दलाच्या छावणीतील क्रमांक 9 जवळ बिबट्या दिसल्याची माहिती नागरिकांनी जवानांना दिली. सकाळीही तो परिसरात दिसल्याचे सांगण्यात आले. बिबट्याच्या भीतीने नागरिकांनी घराबाहेर मोठे दिवे लावण्यास सुरुवात केली आहे. संध्याकाळनंतर लहान मुलांना घराबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. वन विभागाने तातडीने मोठा पिंजरा लावून बिबट्याला पकडावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र, या घटनांबाबत वन विभागाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.





