सोन्याच्या व्यवहारातून कोट्यवधींची फसवणूक
लिलावातील सोने स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष

1 कोटी 12 लाखांच्या फसवणूकप्रकरणी कारवाई
अमरावती /9 नोव्हेंबर- बँकेच्या नीलामीत मिळणारे सोने कमी किमतीत खरेदी करून त्यातून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 1 कोटी 12 लाख 47 हजार 600 रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या स्वप्निल अनिल भुईभार याला न्यायालयाने पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावली. गाडगेनगर पोलिसांनी त्याला पुण्यातील पिंपरी चिंचवड येथून अटक केली होती. या प्रकरणातील तक्रारदार हॉटेल व्यावसायिक विक्रम गुप्ता यांनी 27 ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली होती.
आरोपी स्वप्निल भुईभार याने मुथूट फायनकॉर्प आणि सीएसबी बँकेतील सोन्याच्या नीलामीचा हवाला देत कमी किमतीत सोने मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर सोने विकून चांगला नफा मिळवता येईल, असे सांगून विक्रम गुप्ता, त्यांचे मोठे भाऊ जयेश गुप्ता, आई आणि पत्नी यांच्याकडून एकूण 1 कोटी 48 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. यातील काही रक्कम परत करण्यात आली; मात्र उर्वरित पैसे आणि सोन्याचे दागिने परत न करता फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गुप्ता कुटुंबाचे 297.99 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी बँकेत गहाण ठेवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या दागिन्यांची किंमत 41 लाख 71 हजार 860 रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. 9 फेब्रुवारी 2024 ते 6 मार्च 2026 या काळात हा व्यवहार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 316 (2), 318 (4) आणि 3 (5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेनंतर पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. आरोपी एका प्रमुख राजकीय नेत्याचा जावई असल्याचीही माहिती समोर आली आहे.





