भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण बिनविरोध

पक्षाला मिळाले धडाकेबाज नेतृत्व

मुंबई / 1 जुलै: विधानसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर भाजपकडून आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संघटनात्मक मोठे बदल केले जात आहेत. याच पोर्शभूमीवर आता गेल्या काही महिन्यांपासून सर्वांचेच लक्ष लागलेल्या महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी अखेर रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवडीचा मेळावा मुंबईत मंगळवारी (ता.1 जुलै) आयोजित करण्यात आला होता. याच मेळाव्यात आता भाजपच्या दिल्लीतून पक्षनेतृत्वानं संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केलेल्या संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, चंद्रशेख बावनकुळे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपकडून जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. या नियुक्त्यांनंतर आता प्रदेशाध्यक्षपदाची निवड करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या प्रदेशाध्यक्षपदी भाजप नेमकी कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता होती. ती रविंद्र चव्हाण यांच्या निवडीने संपली आहे. भाजपमध्ये ’एक व्यक्ती एक पद’,असा नियम आहे. त्यानुसार बावनकुळे यांच्याकडे असलेल्या प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांना संधी देण्यात आली. रवींद्र चव्हाण हे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक व स्थायी समितीचे अध्यक्ष होते. नगरसेवक असताना चव्हाण 2009 मध्ये डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून पहिले विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. 2014 आणि 2019, 2024 मध्ये चव्हाण यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जिंकल्या. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात सर्वाधिक मते मिळवून विजय मिळवला. 2016 मध्ये त्यांना महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांच्याकडे बंदरे, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण आणि अन्न, नागरी पुरवठा मंत्री तसेच रायगड पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आली होती.

संबंधित बातम्या

Back to top button