ऊर्ध्व वर्धा प्रकल्प क्षेत्रात पाणीटंचाई; रब्बी हंगामासाठी पाणी सोडणे अशक्य

अमरावती । 9 नोव्हेंबर : यंदाच्या रब्बी हंगामासाठी ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून (अप्पर वर्धा धरण) सिंचनासाठी पाणी सोडणे शक्य होणार नाही, असे जलसंपदा विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. यावर्षी पडलेला अपुरा पाऊस आणि अल-निनो तसेच आयओडी (इंडियन ओशीयन डायपोल) च्या प्रभावामुळे धरणातील उपयुक्त पाणीसाठा घटला आहे. धरण क्षेत्रात पाणीसाठा शिल्लक नसल्यामुळे यंदा रब्बी हंगाम 2026-27 राबविणे शक्य होणार नसून उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आल्याचे उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.गु.उमप यांनी कळविले आहे.
या पाटबंधारे विभागाने जाहीर प्रकटनानुसार उर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत धरणाची सद्यस्थिती आणि पाणी नियोजनाची माहिती कळविली आहे. त्यानुसार 9 नोव्हेंबर 2026 पर्यंत धरणात एकूण क्षमतेच्या 41.86 टक्के (236.10 दश लक्ष घनमिटर) उपयुक्त पाणीसाठा असून वार्षिक सरासरी बाष्पीभवनाप्रमाणे यातील 88.51 दलघमी पाणीसाठा कमी होणार आहे. धरण परीक्षेत्रातील महानगरपालिका, नगरपरिषदा, ग्रामपंचायती आणि शासनाच्या अन्य पाणीपुरवठा योजनांसाठी 66.84 दलघमी पिण्याचे पाणी आणि औद्योगिक वार्षिक एकूण 29.75 दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. तर शासकीय निर्णयाच्या अधीन राहून 33.09 दलघमी म्हणजेच 10 टक्के पाणी हे आकस्मीक राखीव साठा म्हणून ठेवण्यात आले आहे. गुरे-जनावरांसाठी 10 दलघमी पाण्याचा राखीव साठा ठेवण्यात आला असल्याने शेतीच्या रब्बी हंगामासाठी धरणात पाणी शिल्लक नसल्याचे उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाद्वारे कळविण्यात आले आहे.
शासकीय आदेशानुसार, भविष्यात प्रत्यक्षात पाऊस पडून धरणात उपलब्ध होणार्या पाणी साठयातून प्रथम पिण्यासाठी, वीज निर्मितीसाठी व औद्योगिक वापरासाठी पाणी आरक्षित करण्यात येणार आहे. त्यानंतर उपलब्धता लक्षात घेऊन सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल.जलसंपदा विभागाने पाणी वापर संस्था, लाभधारक आणि नागरिकांना पाणी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती समजून प्रत्येकाने त्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, धरणातून किंवा कालव्यातून पाण्याचा अनधिकृत वापर केल्यास ’महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976’ मधील तरतुदींनुसार कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, पाणी पुरवठ्याबाबत कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा वित्तहानी होणार नाही, यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे कळविण्यात आले आहे.





