आयुक्त बंगल्यावर कचरा फेकून निषेध
पालकमंत्री कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा मुन्ना राठोडांचा इशारा

अमरावतीत घाणीचे साम्राज्य पसरल्याने संतापाचा भडका
अमरावती/9 नोव्हेंबर – शहरातील दैनंदिन स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रशासनाने तातडीने साफसफाई न सुधारल्यास सर्व प्रभागांतील कचरा थेट पालकमंत्र्यांच्या दारात ओतण्याचा इशारा माजी काँग्रेस नगरसेवक मुन्ना राठोड यांनी दिला. ऐन सणाच्या दिवशी आयुक्त गोंदावले यांच्या निवासस्थानी स्वतःच्या घरातील घाण टाकून प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
दिवाळीच्या काळात शहरात जागोजागी कचर्याचे मोठे ढीग साचले असून दुर्गंधीमुळे डासांचा उपद्रव भयंकर वाढला आहे. प्रभाग 18 राजापेठ सह अनेक भागांत लोकांच्या घरासमोर कचरा पडून राहिल्यामुळे अमरावतीकरांवर घाणीत सण साजरा करण्याची वेळ ओढवली. महापालिकेच्या इतिहासात जनतेला अशी काळी दिवाळी कधीच अनुभवावी लागली नव्हती. प्रशासनाच्या अशा ढिसाळ कारभारामुळे लोकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. या अनास्थेचा तीव्र निषेध करण्यासाठी मुन्ना राठोड यांनी स्वतः आयुक्त गोंदावले यांच्या शासकीय बंगल्यावर जाऊन कचरा फेकला. झोपलेल्या महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठीच हे पाऊल उचलल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील तब्बल 8 लाख जनतेच्या जीवाशी हा उघड खेळ चालवला जात आहे. प्रशासनाने तात्काळ जागे होऊन शहरातील संपूर्ण स्वच्छता पूर्ववत करावी. अन्यथा सर्व प्रभागांमधून घाण गोळा करून ती पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयात ओतण्यात येईल असा इशारा देण्यात आला. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहिल्यास तीव्र लढा उभारू. शहरात साथीचे आजार पसरल्यास त्याला मनपा प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील असे काँग्रेस नेते मुन्ना राठोड यांनी या वेळी प्रशासनाला ठणकावून सांगितले असून जनहितासाठी हा लढा सुरूच राहील.





