गोकुळच्या निर्णयाविरोधात सतेज पाटील रस्त्यावर

संघर्ष मोर्चात प्रचंड गर्दी

5 शासननियुक्त संचालकाच्या नियुक्तीस विरोध

कोल्हापूर/9 नोव्हेंबर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला 25 पैकी 13 जागा मिळाल्या आहेत, तर महायुती पॅनलकडे 12 जागा आहेत.
बहुमत असूनही अध्यक्ष निवडीचा पेच निर्माण झाला आहे. परंतु, या पेचातून मार्ग काढण्यासाठी संचालक मंडळावर 5 शासननियुक्त संचालकांची नियुक्ती करण्याचा निर्णय 4 नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचा विरोधी पक्षांकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे. अशातच या निर्णयाविरोधात आज सोमवारी (9 नोव्हेंबर) कोल्हापुरात आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात संघर्ष मोर्चा काढण्यात आला आहे. कोल्हापुरातील दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाला दुध उत्पादकांपासून ते शेतकर्‍यांपर्यंत हजारो लोक उपस्थित आहेत. गोकुळसाठीच्या संघर्ष मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये मोर्चेकरी मोठ्या संख्येने जमा झाल्याचे पाहायला मिळाले. या मोर्चाध्ये मोर्चेकर्‍यांनी दुभत्या म्हशी, रेडा, भस्मासुर, कोल्हापुरी पायताण, अशा विविध प्रतिकात्मक वस्तू आणत सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. त्यामुळे मोर्चेकर्‍यांनी आणलेल्या वस्तुंनी सुद्धा लक्ष वेधले आहे. इतकेच नव्हे तर आसूड सुद्धा शेतकर्‍यांकडून ओढण्यात येत आहे. या मोर्चासाठी केवळ कोल्हापुरातूनच नव्हे तर सांगली, सातार्‍यातील शेतकरी सुद्धा आल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूरच्या दसरा चौकामध्ये मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Back to top button