साहिल आत्महत्या प्रकरणात वाकोडे दांपत्याने घेतली राहुल गांधींची भेट
आरोपींना अटक होईपर्यंत संघर्ष करण्याची ग्वाही

नवी दिल्ली/6 नोव्हेंबर : आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल रवींद्र वाकोडे (20) याच्या आत्महत्या प्रकरणाचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यामुळे त्याच्या पालकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवाय साहिलचे वडील रवींद्र वाकोडे आझाद मैदानात आंदोलन करत आहेत.
त्यानंतरही सरकार दखल घेत नसल्याने वाकोडे दांपत्याने आज (5 नोव्हेंबर 2026) दिल्लीत काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीत राहुल गांधी यांनी हे संपूर्ण प्रकरण समजून घेतले आणि आरोपींना अटक होईपर्यंत संघर्ष करण्याची ग्वाही वाकोडे कुटुंबाला दिली. साहिल वाकोडे यांच्या आत्महत्येला 45 दिवस झाले आहेत. तरीही आरोपींना अजून अटक केलेली नाही. त्यामुळे वाकोडे दांपत्य उद्विग्न झाले आहेत.
खासदार वर्षा गायकवाड यांच्या सहकार्याने रवींद्र वाकोडे आणि त्यांच्या पत्नी यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीत राहुल गांधी यांनी वाकोडे कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना सहकार्य करणार तसेच आरोपी सापडेपर्यंत त्यांच्यासोबत संघर्ष करण्याची भूमिका राहुल गांधी यांनी व्यक्त केली, असे वर्षा गायकवाड यांनी माध्यमांना सांगितले. 18 सप्टेंबर 2026 रोजी साहिल वाकोडे याने आत्महत्या केली होती. परीक्षेदरम्यान त्याच्याकडे मोबाईल फोन सापडल्यावरून कॉपी केल्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर मानसिक तणावातून त्याने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.





