शेतकर्यांच्या खात्यात 641 कोटींची मदत जमा
अमरावती विभागातील दुष्काळग्रस्त

12 लाख 82 हजार 203 शेतकर्यांना लाभ
मुंबई/6 नोव्हेंबर : राज्यातील 304 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकर्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये दिवाळी अग्रीम देण्याची ग्वाही दिली होती.
यानुसार 5 नोव्हेंबर 2026 अखेर राज्यातील 87 लाख 45 हजार 669 शेतकर्यांच्या खात्यात 4 हजार 372 कोटी 83 लाख रुपयांची दिवाळी अग्रीम मदत वितरित झाली आहे. त्यापैकी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण 12 लाख 82 हजार 203 शेतकर्यांच्या खात्यात 641 कोटी 10 लाख रुपयांच्या दिवाळी अग्रीम मदतीचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित पात्र शेतकर्यांनाही मदत देण्याची प्रक्रिया सुरू असून, तांत्रिक अडचणींमुळे काही शेतकर्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नसल्यास त्या अडचणी दूर करून त्यांनाही अग्रीम मदत देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी नुकतीच दिली आहे.राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकर्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाने दिवाळी अग्रीम मदतीचा निर्णय घेतला. महसूल, मदत व पुनर्वसन आणि कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांनी मदत वितरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर राबववून थेट शेतकर्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यावर भर देण्यात आला. या मदतीमुळे लाखो शेतकर्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. अमरावती विभागातील 12 लाख 82 हजार 203 शेतकर्यांच्या खात्यात 641 कोटी 10 लाख रुपये जमा झाले आहेत. यामध्ये अकोला जिल्ह्यातील 1 लाख 62 हजार 152 शेतकर्यांना 81 कोटी 8 लाख रुपये, अमरावती जिल्ह्यातील 3 लाख 6 हजार 709 शेतकर्यांना 153 कोटी 35 लाख रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील 4 लाख 25 हजार 833 शेतकर्यांना 212 कोटी 92 लाख रुपये, वाशिम जिल्ह्यातील 1 लाख 59 हजार 508 शेतकर्यांना 79 कोटी 75 लाख रुपये आणि यवतमाळ जिल्ह्यातील 2 लाख 28 हजार 1 शेतकर्यांना 114 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.





