दिवाळीत आगीच्या घटनांवर अग्निशमन दलाचा वॉच
कोट्यवधींची मालमत्ता वाचवण्यासाठी विशेष तयारी

अमरावती/5 नोव्हेंबर – दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता अमरावती महापालिकेच्या अग्निशमन विभागाने विशेष सतर्कता बाळगली आहे. मागील काही वर्षांतील दिवाळीच्या काळात आगीच्या अनेक घटना घडल्या असून, त्यात घरे, व्यापारी गोदामे, मोकळे भूखंड आणि वाहनांचे नुकसान झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन यंदाही पुढील आठवडाभर अग्निशमन दल सज्ज राहणार आहे.
मनुष्यबळ आणि साधनांची मर्यादा असतानाही कोट्यवधींची मालमत्ता वाचवण्यासाठी विशेष पथके, पाण्याचे बंब आणि बचाव वाहने तयार ठेवण्यात आली आहेत. अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी हंबर्डे आणि वाहन विभागप्रमुख अजय पंधरे यांनी ही माहिती दिली.
उपलब्ध आकडेवारीनुसार, 2023 मध्ये दिवाळीदरम्यान आगीच्या 17 घटना घडल्या होत्या. त्यापैकी 5 घटना फटाक्यांमुळे झाल्या. 2024 मध्ये आगीच्या 14 घटनांची नोंद झाली असून, त्यातील 2 घटना फटाक्यांशी संबंधित होत्या. तर 2025 मध्ये वॉलकट कंपाऊंड परिसरातील मध्यवर्ती नियंत्रण कक्षाच्या नोंदीनुसार दिवाळीच्या काळात 16 आपत्कालीन घटनांची नोंद झाली. त्यापैकी 2 घटना फटाक्यांमुळे लागलेल्या आगीच्या होत्या.
या घटनांमध्ये घरे, व्यापारी गोदामे, मोकळ्या जागा आणि वाहनांना फटका बसला होता. 2021 आणि 2022 मध्येही अशाच प्रकारच्या घटना घडल्याने महापालिकेने हंगामी आपत्ती व्यवस्थापनाची तयारी अधिक मजबूत केली होती. यंदा आगीच्या घटना रोखण्यासाठी आणि आपत्कालीन प्रसंगी तातडीने मदत पोहोचवण्यासाठी प्रमुख अग्निशमन केंद्रांसह उपकेंद्रांवर विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. दिवाळीच्या रात्री पाण्याचे बंब पूर्ण भरून ठेवण्यासह अग्निशमन यंत्रणा आणि कर्मचारी सज्ज राहणार आहेत. प्रत्येक पाळीत 2 डझनपेक्षा अधिक अग्निशमन कर्मचारी उपलब्ध राहतील. नागरिकांनीही फटाके फोडताना काळजी घ्यावी, असे आवाहन विभागाने केले आहे.
दिवाळीत अग्निशमन दलाची विशेष सज्जता महापालिकेच्या अग्निशमन विभागात कायमस्वरूपी आणि कंत्राटी मिळून एकूण 107 कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये 25 कायमस्वरूपी अग्निशमन कर्मचारी, 31 कंत्राटी अग्निशमन कर्मचारी आणि 41 कंत्राटी वाहनचालकांचा समावेश आहे. याशिवाय 15 पाण्याचे बंब, 3 बचाव वाहने आणि 1 मुख्य अग्निशमन केंद्रासह 3 उपकेंद्रांच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याची तयारी करण्यात आली आहे.





