आदिम जमाती आणि पारधी समाजासाठी 160 कोटीचे पॅकेज
शिक्षण, रोजगार, निवास आणि मूलभूत सुविधांवर भर

मुंबई/5 नोव्हेंबर- राज्य शासनाने ‘विकसित महाराष्ट्र 2047’ अंतर्गत कातकरी, कोलाम व माडिया या आदिम जमातींसह पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी 2026-27 च्या अर्थसंकल्पात 160 कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची तरतूद केली आहे.
यापैकी आदिम जमातींसाठी 130 कोटी रुपये, तर पारधी समाजासाठी 30 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या योजनांसाठी 100 टक्के शासकीय अनुदान देण्याची तरतूद या पॅकेजमध्ये करण्यात आली आहे. आदिम समाजाच्या सर्वांगीण विकासा साठी विशेष पॅकेजद्वारे निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा 2026-27 च्या अर्थ संकल्पात करण्यात आली होती. त्यानुसार राज्य शासनाने 2 नोव्हेंबर 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित करून या पॅकेजची अंमलबजावणी सुरू केली आहे. आदिम जमाती पॅकेजमधील 130 कोटी रुपयांपैकी 100 कोटी रुपये मूलभूत सोयी-सुविधांसाठी, तर 30 कोटी रुपये वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या योजनांसाठी वापरण्यात येणार आहेत. पारधी समाजासाठीच्या 30 कोटी रुपयांपैकी 10 कोटी रुपये मूलभूत सोयी-सुविधांसाठी आणि 20 कोटी रुपये वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांसाठी उपलब्ध असतील.





