पूर्णा प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले

जलस्तर 448 मीटरवर

* नदीकाठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

अमरावती / 1 जुलै: विदर्भ सिंचन विकास मंडळाअंतर्गत चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा प्रकल्पाचे दोन दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले असून प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पुढील 48 तासांसाठी नदीकाठावरील गावांमधील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय अभियंत्यांनी दिली आहे. पूर्णा प्रकल्प हा मध्यम प्रकल्प असून अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचा प्रकल्प आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांत सातत्याने मुसळधार पाउस कोसळत असल्याने प्रकल्पात पाण्याचा मोठ्या प्रमाणात संचय होत आहे. सध्या पूर्णा प्रकल्पाचा जलस्तर 448 मीटरवर पोहोचला आहे. तो प्रकल्पाच्या क्षमतेच्या 57.20 टक्के एवढा आहे. पूर्णा प्रकल्पात 56 टक्क्यांवर पाणी संकलित झाल्यास पाण्याचा विसर्ग करणे आवश्यक ठरते. पुढील काही दिवस पूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पावसाची शक्यता असल्याने जलस्तर आणखी वाढण्याची संभावना आहे. त्यामुळे सतर्कता म्हणून आजपासून प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पुढील 48 तास या दोन दरवाजांमधून पाणी सोडण्याचा निर्णय सिंचन विभागाने घेतला आहे. त्यामुळे नदीला पूर येण्याची शक्यता आहे. परिणामी नदीकाळावरील गावांतील रहिवाशांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button