परवान्याविना मिठाई कारखाना सुरूच

अन्न प्रशासनाची धडक कारवाई, हजारो रुपयांचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त

अमरावती /4 नोव्हेंबर- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. याच मोहिमेअंतर्गत मंगळवारी 3 नोव्हेंबर रोजी प्रशासनाच्या पथकाने ’माँ भगवती मिठाई व फराळ कारखाना’ येथे अचानक तपासणी केली. यावेळी हा कारखाना कोणत्याही वैध परवान्याशिवाय सुरू असल्याचे उघड झाले. तपासणीत हजारो रुपयांचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, कारखान्याचे उत्पादन आणि विक्री तात्काळ बंद करण्याची नोटीस संचालकाला बजावण्यात आली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी अदिती देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारखान्याची तपासणी केली. यावेळी कारखान्यात तयार होत असलेल्या शेव, नमकीन, रसमलाई, पेढे यासह विविध खाद्यपदार्थांची पाहणी करण्यात आली. या पदार्थांच्या गुणवत्तेबाबत संशय आल्याने अधिकार्‍यांनी वेगवेगळे नमुने घेतले. हे नमुने पुढील तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. दिवाळीच्या काळात मिठाई आणि फराळाची मागणी वाढते. याचा फायदा घेऊन काही व्यावसायिक विनापरवाना व्यवसाय करतात किंवा खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेशी तडजोड करतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तपासणी मोहीम तीव्र केली आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यावसायिकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी मिठाई आणि फराळ खरेदी करताना पदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि विक्रेत्याची विश्वासार्हता तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button