दुष्काळी मदतीसह कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा होणार

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

आतापर्यंत 73 लाख शेतकर्‍यांना लाभ

मुंबई /4 नोव्हेंबर: दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी जाहीर केलेली पाच हजार रुपयांची अग्रिम मदत येत्या दोन दिवसांत राज्यातील 95 टक्के शेतकर्‍यांच्या खात्यांमध्ये जमा होईल. आतापर्यंत 73 लाख शेतकर्‍यांच्या खात्यांत ही रक्कम जमा झाली असून, उर्वरित शेतकर्‍यांनाही लवकरच मदत मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. याशिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत आज पुन्हा चार लाख 86 हजार शेतकर्‍यांच्या खात्यांत चार हजार 764 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. आतापर्यंत सुमारे 21 लाख शेतकर्‍यांना 19 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या मदतीची माहिती दिली. ते म्हणाले, राज्य शासनाच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी अग्रिम मदत म्हणून पाच हजार रुपये देण्याचे आपण घोषित केले होते. त्यानुसार आतापर्यंत 73 लाख शेतकर्‍यांच्या खात्यांमध्ये पैसे पोहोचले आहेत आणि पुढील दोन दिवसांत जवळपास 95 टक्के शेतकर्‍यांच्या खात्यांमध्ये पैसे पोहोचतील. पाच टक्के शेतकरी थोडे मागे-पुढे होतात, कारण त्यांच्या खात्यांमध्ये काही अडचणी असतात. मात्र, आतापर्यंत 73 लाख शेतकर्‍यांच्या खात्यांत पैसे जमा झाले असून, पुढील दोन दिवसांत बहुतांशशेतकर्‍यांच्या खात्यांत ही रक्कम जमा होईल. त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत आज पुन्हा चार लाख 86 हजार शेतकर्‍यांच्या खात्यांमध्ये चार हजार 764 कोटी रुपये जमा केले आहेत. आज जमा करण्यात आलेल्या रकमेत मराठवाड्यातील शेतकर्‍यांचा सर्वाधिक वाटा आहे. मराठवाड्यातील जवळपास दोन लाख 76 हजार शेतकर्‍यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीचे पैसे राज्य सरकारच्या वतीने जमा करण्यात आले आहेत. एकूण विचार केला, तर आतापर्यंत जवळपास 21 लाख शेतकर्‍यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा केली असून, त्यासाठी सुमारे 19 हजार कोटी रुपये दिले आहेत. अजूनही याद्यांचे प्रमाणीकरण सुरू आहे. जसजसे प्रमाणीकरण होत जाईल, तसतसे संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा करण्याची कार्यवाही सुरू राहील.
महायुतीचे सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांना मदत करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे आणि या योजनांचे प्रत्यक्ष पैसेदेखील शेतकर्‍यांच्या खात्यांमध्ये जमा होत आहेत. दिवाळी शेतकर्‍यांसोबत साजरी करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतला आहे. हा माझा एकट्याचा आदेश नाही. सर्व मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर दिवाळी शेतकर्‍यांसोबत साजरी केली पाहिजे, असे सर्वांचे मत आहे. त्यामुळे आमच्या सर्वांचा प्रयत्न असेल की, दिवाळीच्या निमित्ताने कोणाच्या तरी घरी, शेतकर्‍यांकडे जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करावी.

Back to top button