महाराष्ट्रात 1440 वैद्यकीय अधिकार्यांची नियुक्ती
ग्रामीण आरोग्य सेवेला मिळणार बळकटी

आज नियुक्ती सोहळ्याचे आयोजन
मुंबई/3 नोव्हेंबर : महाराष्ट्र सरकारने जनतेला उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सामान्य, खेड्या पाड्यातील, दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये वैद्यकीय अधिकार्यांच्या भरतीला प्राधान्य दिले आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा गट-अ (ड-20) गटातील 1 हजार 440 वैद्यकीय अधिकार्यांची नियुक्ती आदेश वितरित करण्याचा विशेष समारंभ उद्या 4 नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये 674 विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि 766 एमबीबीएस वैद्यकीय अधिकार्यांचा समावेश आहे. या नियुक्त्यांमुळे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला मोठे मनुष्यबळ मिळणार असून शासकीय रुग्णालयांमधील वैद्यकीय अधिकार्यांची कमतरता दूर करण्यास मदत होणार आहे. यामुळे राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख करण्यासाठी राज्य सरकारकडून रिक्त पदे भरण्याला प्राधान्य दिले जात आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणार्या प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांतील डॉक्टरांची संख्या वाढवणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना किरकोळ आजारांपासून ते गंभीर आजारांपर्यंतच्या उपचारांसाठी मोठ्याशहरांमध्ये धाव घ्यावी लागू नये, तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत मिळून ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी ही भरती महत्वपूर्ण ठरणार आहे. राज्यातील वैद्यकीय अधिकारी संवर्गातील एकूण 2 हजार 514 पदांपैकी 1 हजार 440 पदांसाठी 27 फेब्रुवारी 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत 674 विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि 766 एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी अशा एकूण 1 हजार 440 पदांचा समावेश आहे.





