राहुल गांधींचे मोदींना पुन्हा चर्चेसाठी थेट आव्हान

24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा

नवी दिल्ली/3 नोव्हेंबर : इंडिया आघाडीने रविवारी (01 नोव्हेंबर) दिल्लीतील रामलीला मैदानावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महारॅलीचे आयोजन केले होते. त्यानंतर सोमवारी (02 नोव्हेंबर) एनडीएकडून देशभरात ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. एनडीएच्या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. परकीय शक्तींच्या मदतीने पंतप्रधान सत्तेत टिकून असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना खुल्या चर्चेचे आव्हान केले होते. यानंतर आज (03 नोव्हेंबर) राहुल गांधी यांनी खुल्या चर्चेवरून मोदींना घेरले आहे.
राहुल गांधी यांनी द वर एका पोस्टद्वारे म्हटले की, पंतप्रधान मोदी मी तुम्हाला आव्हान देऊन 24 तास उलटून गेले आहेत. तुम्ही म्हणता की, विरोधक ‘राष्ट्रविरोधी’ आहेत. मग तुम्ही या विषयावर चर्चा करण्यासाठी कोणताही मंच निवडा, कोणतीही जागा निश्चित करा आणि माझ्याशी चर्चा करा. राष्ट्रविरोधी कोण आहे? परकीय शक्तींशी कोणाचे संबंध आहेत? आणि ते संबंध नेमके कशा प्रकारचे आहेत? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी लवकरात लवकर चर्चा करूया. तुम्ही घाबरू नका. कारण आपण दोघे तिथे असू, मीडिया असेल, देशातील तरुण असतील. एक टेबल असेल. एका बाजूला तुम्ही बसा आणि दुसर्‍या बाजूला मी बसतो. तुम्हाला हवं असेल त्याला पंच म्हणून नियुक्त करा. मोहन भागवत यांना खुर्चीवर बसवलं तरी हरकत नाही. त्यानंतर आपण चर्चा करूया, असे आव्हान त्यांनी केले आहे.राहुल गांधी म्हणाले की, आर्थिक व्यवस्था? आर्थिक संरचना? अमेरिकेसोबतचा तो करार कसा झाला? का झाला? इतक्या घाईत का झाला? तुम्ही एकट्यांनी तोकरार का केला? मंत्रिमंडळाला का सांगितले नाही? अदानी प्रकरणाची फाईल का बंद केली गेली? आणि एपस्टीन प्रकरण यासारख्या अनेक विषयांवर आपण मोकळेपणाने चर्चा करू शकतो. तुम्ही या, घाबरू नका. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या. तुम्ही माझ्यावर आरोप करता ना? चला, मग सर्व काही स्पष्ट होऊन जाऊ दे. इतर अनेक मुद्द्यांवर तुम्ही माझ्यावर मानहानीचे खटले दाखल केले आहेत, कदाचित 45 खटले असतील. पण या चर्चेच्या विषयावर आणि परकीय संबंधांच्या मुद्द्यावर तुम्ही माझ्याविरोधात मानहानीचा खटला का दाखल करत नाही? तोही खटला दाखल करा आणि त्यावरही आपण मोकळेपणाने चर्चा करू. चला, मग या सर्व गोष्टींवर चर्चा करूया, असे आव्हान देत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

Back to top button