चिंचखेडला वनराई बंधार्यातून जलसंधारण

अकोला /1 नोव्हेंबर– जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी झालेला पाऊस व त्यामुळे सातत्याने घटत चाललेली भूजल पातळी पर्यायाने नाल्यांमधील प्रवाह कोरडा होत आहे हे लक्षात घेऊन
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या पुढाकारातून जिल्ह्यातील चिंचखेड या गावी वनराई बंधारा निर्माण करण्यात आला. यंत्रणेचे उपसंचालक डॉ . चंद्रकांत भोयर यांच्या मार्गदर्शनात भूजल सर्वेक्षण कार्यालय, अकोला यांच्यातर्फे चिंचखेड गावकर्यांच्या सहभागातून हा बंधारा निर्माण झाला. तांत्रिक मार्गदर्शन वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड यांनी केले. यावेळेस गावाचे सरपंच विकास वानखेडे, ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. चिंचखेड गावाजवळील नाल्यावर 11 मीटर रुंदीचा आणि 1 मीटर उंचीचा वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. त्यामुळे बंधार्याच्या वरील बाजूस पाणी साठा निर्माण झाला आहे. नाल्यातून वाहून जाणारा प्रवाह थांबवून त्याचा उपयोग मुख्यत्वे जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व परिसरातील भूजल पातळी टिकवणे यासाठी होईल. सहाय्यक भूवैज्ञानिक राजु गवई, पूजा सापकर, निलेश इंगळे, कनिष्ठ भूवैज्ञानिक प्रणाली सुखदेवे तसेच कार्यालयातील सर्व कर्मचारी, तसेच जिल्हा व उपविभागीय पिण्याचे पाणी तपासणी प्रयोगशाळेतील कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.





