दीपावलीनिमित्त महाकाली मंदिरात बरकत प्रसादाचे आयोजन

गर्भगृहातील मातेची मूर्ती शेंदरी भगव्या रंगात विराजमान

दिवाळीच्या महाआरतीनंतर रात्री होणार वाटप
44 वर्षांची जुनी समृद्ध परंपरेची नोंद
पीठाधीश्वर डॉ. शक्ती महाराज करणार बरकतीचे वाटप

अमरावती / 1 नोव्हेंबर- शहरातील भूतेश्वर चौकाजवळ हिंदू स्मशानभूमीच्या पाठीमागे असलेल्या प्रसिद्ध महाकाली माता शक्तीपीठ मंदिरात यंदाच्या दिवाळी सणानिमित्त 8 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता भव्य महाआरतीनंतर भाविकांना रोख रक्कम (पैसे) आणि सोन्या-चांदीच्या नाण्याची पवित्र बरकत प्रसाद वाटण्यात येणार असून, पीठाधीश्वर महामंडलेश्वर 1008 डॉ. शक्ती महाराज यांच्या मार्गदर्शनात हा सोहळा पार पडेल.अमरावतीच्या भूतेश्वर चौक परिसरातील पुरातन महाकाली माता शक्तीपीठ संस्थानमध्ये यंदाच्या दिवाळीनिमित्त भाविकांसाठी अनोख्या आणि मंगलमय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सिद्ध पीठात गेली 43 वर्षे अविरत सुरू असलेला हा उपक्रम यंदा दिमाखात 44 व्या वर्षात पदार्पण करत आहे. सुमारे 44 वर्षांपूर्वी अवघ्या 100 भाविकांच्या उपस्थितीत सुरू झालेली ही समृद्धीची परंपरा आज विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे मोठे श्रद्धास्थान बनली आहे.
या पावन पर्वावर 8 नोव्हेंबर रोजी रात्री ठीक 8 वाजता गर्भगृहात महाकाली मातेची मंत्रोच्चारात भव्य महाआरती संपन्न होईल. महाआरती पूर्ण झाल्यानंतर महाशक्ती पीठाधीश्वर महामंडलेश्वर 1008 डॉ. शक्ती महाराज यांच्या हस्ते उपस्थित सर्व भाविकांना हा समृद्धीचा बरकत प्रसाद दिला जाईल. या प्रसादात रोख रक्कम आणि सोन्याचा अंश असलेली सुवर्ण नाणी भक्तांना दिली जातात. हा पवित्र प्रसाद घरातील तिजोरीत किंवा दुकानाच्या गल्ल्यात ठेवल्यास वर्षभर घरात बरकत राहते आणि धनधान्याची कधीही तूट भासत नाही, अशी भक्तांची अतूट श्रद्धा आहे.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील गर्भगृहातील महाकाली मातेची मूर्ती काळ्या पाषाणाची नसून दुर्मीळ अशा शेंदरी भगव्या रंगात विराजमान आहे. हे दर्शन भक्तांच्या मनातील भीती दूर करून नवी ऊर्जा देते. मंदिर परिसरात प्रभू श्रीराम, माता जानकी, लक्ष्मण, पवनपुत्र हनुमान, दुर्गा माता, भव्य शिवालय असून येथे अखंड गोसेवा सुद्धा चालते. या सोहळ्याला शहर आणि ग्रामीण भागातील भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Back to top button