बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेनचे लोकार्पण
मुंबईच्या इतिहासात नवा अध्याय

16 तासात अंतर पूर्ण करू शकणार
मुंबई/1 नोव्हेंबर -बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित मुंबई ते बंगळुरू दरम्यान धावणारी वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशांच्या सेवेत सुरू झाली आहे. बंगळुरूहून या ट्रेनचे लोकार्पण करण्यात आले. देशातील ही तिसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन ठरली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, आरामदायी शयनव्यवस्था आणि प्रवाशांसाठी उपलब्ध केलेल्या विविध सुविधांमुळे ही गाडी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी महत्त्वाची ठरणार आहे. मुंबई ते बंगळूरू या मार्गावर रेल्वेने प्रवास करण्यासाठी सुमारे 24 तास लागतात. नव्या वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसमुळे हा प्रवास सुमारे 16 तासांत पूर्ण करता येणार आहे. प्रवासाच्या वेळेत सहा ते आठ तासांची बचत होण्याची अपेक्षा आहे. मुंबई आणि बंगळुरू या दोन प्रमुख शहरांदरम्यान वेगवान आणि आरामदायी रेल्वे प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. दिव्यांग प्रवाशांसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली असून, त्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायी व्हावा, यासाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या गाडीमध्ये एकूण 16 वातानुकूलित डबे असून, त्यांत 823 बर्थची व्यवस्था आहे. यामध्ये तृतीय श्रेणी वातानुकूलितचे 11, द्वितीय श्रेणी वातानुकूलितचे चार आणि प्रथम श्रेणी वातानुकूलितचा एक डबा आहे. या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे तिकीट दर थर्ड एसी – 2810, सेकंड एसी – 3630, फर्स्ट एसी – 4450 असे असणार आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांना आरामदायी आणि सुरक्षित सेवा मिळावी, या दृष्टीने गाडीची अंतर्गत रचना करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई ते बंगळूरदरम्यान या गाडीला कल्याण, पुणे, सोलापूर, कलबुर्गी, यादगीर, रायचूर, गुंटकल आणि अनंतपूर या आठ मध्यवर्ती स्थानकांवर थांबा प्रस्तावित आहे.





