नागपूर-पुणे हवाई प्रवास महागला

साडेपाच हजाराचे तिकीट थेट 19 हजारांवर

नागपूर/29 ऑक्टोबर – दिवाळीसाठी पुण्याहून नागपूरला येणार्‍या प्रवाशांना विमान कंपन्यांनी मोठा झटका दिला आहे. नेहमी 5,500 ते 6,500 रुपयांत मिळणारे पुणे-नागपूरचे वन-वे तिकीट दिवाळीच्या गर्दीत थेट 19,068 ते 42,682 रुपयांवर गेले आहे. म्हणजे 193 टक्के ते 675 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.दिवाळीच्या 4 ते 7 नोव्हेंबर काळातल्या तिकिटांचे दर पाहून प्रवासी हादरले आहेत. कुटुंबासह गावी येणार्‍या चार जणांना फक्त जाण्यासाठीच 76 हजार रुपये मोजावे लागणार आहेत, जे नेहमी 22 ते 26 हजारांत व्हायचे. विशेष म्हणजे, थेट विमान सर्वात स्वस्त व सर्वात जलद आहे. फक्त 1 तास 25 मिनिटे. पण, तेच तिकीट नेहमीच्या 6,500 रुपयांच्या तुलनेत 19,068 रुपये आहे. कनेक्टिंग फ्लाईट घेऊन तर प्रवाशांचे दुहेरी नुकसान होत आहे. जास्त पैसे देऊन 4 तास 35 मिनिटांपासून ते 14 तास 25 मिनिटांपर्यंत प्रवास करावा लागत आहे. म्हणजे वेळही जास्त व पैसाही जास्त. विमान कंपन्यांच्या नियमानुसार तिकिटाचे दर मागणी व उरलेल्या जागांनुसार ठरतात. कमी भाड्याच्या श्रेणीतील जागा आधी संपतात व नंतर उरलेल्या जागांचे दर वाढत जातात. दिवाळीच्या काळात मागणी प्रचंड असल्याने कंपन्यांनी मुद्दाम कमी भाड्याच्या जागा कमी ठेवल्याचा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे.

Back to top button