ग्रामपंचायत मालकीच्या मोक्याच्या जागांची परस्पर सौदेबाजी

सार्वजनिक जागांच्या विक्रीप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

अधिकार्‍यांकडून दुर्लक्ष झाल्यामुळे तक्रारदाराने गाठले थेट कार्यालय
दप्तर नोंदी तपासून अनधिकृत ताबेदारांवर कारवाईची मागणी

पथ्रोड/9 ऑक्टोबर – शिंदी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील मोक्याच्या सार्वजनिक जागांची परस्पर तोंडी सौदेबाजी करून अनधिकृत ताबा दिल्याची गंभीर बाब चव्हाट्यावर आली असून, या संपूर्ण आर्थिक गैरव्यवहाराची सखोल निष्पक्ष चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी जोरदार मागणी अविनाश शालिकरामजी कावनपुरे यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे पुराव्यांसह दाखल केलेल्या तक्रारीद्वारे केली असून यामुळे पंचक्रोशीत मोठी खळबळ उडाली आहे.
शिंदी बुद्रुक गावातील मोक्याच्या जागा परस्पर लाटण्याचा मोठा डाव आखला गेल्याचा संशय नागरिकांमधून व्यक्त होत आहे. बालक मंदिराच्या नावे नोंद असलेल्या एका जागेबाबत नियमबाह्य व्यवहार उरकल्याची जोरदार चर्चा गावात रंगली आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत इमारतीच्या मागील मोकळी जागा वेगवेगळ्या लोकांना विकून त्यातून मोठी देवाणघेवाण झाल्याची माहिती तक्रारदाराने उघडकीस आणली आहे. या दोन्ही ठिकाणच्या मोक्याच्या जागांची खरी मालकी, ग्रामपंचायतीचे जुने ठराव, अधिकृत प्रशासकीय मंजुरी, ताबा नोंदी आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार या सार्‍या दप्तराची कडक तपासणी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.या गंभीर गैरप्रकाराबाबत अविनाश शालिकरामजी कावनपुरे यांनी यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती आणि गटविकास अधिकारी, पंचायत समिती, अचलपूर यांच्याकडे वारंवार दाद मागूनही स्थानिक पातळीवर कोणतीही ठोस हालचाल झाली नाही. वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणेकडून सतत चालढकल होत असल्याने अखेर तक्रारदाराने जिल्हाधिकार्‍यांचे दार ठोठावले आहे. स्वतंत्र अधिकार्‍यांमार्फत दोन्ही जागांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी, तोंडी सौद्यांमागील आर्थिक सत्य शोधून काढावे, तपास संपेपर्यंत जागेवर नवे बांधकाम किंवा खरेदी-विक्री थांबवावी, असे निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून सार्वजनिक जागा ग्रामपंचायतीच्या ताब्यात परत मिळवून द्यावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

Back to top button