अंबादेवी परिसरातील अतिक्रमणावर धडक मोहीम
महापालिकेची पोलीस पथकाच्या उपस्थितीत कारवाई

अमरावती /6 ऑक्टोंबर – अंबादेवी परिसरात वाढलेल्या अतिक्रमणाविरोधात महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने मंगळवारी दुपारी अचानक कारवाई करीत 2 ते 3 दुकानांचे अतिक्रमण हटविले. सिटी कोतवाली पोलिसांच्या देखरेखीखाली झालेल्या या कारवाईमुळे परिसरातील अतिक्रमणधारकांमध्ये काही काळ खळबळ उडाली. या वेळी स्वतः ठाणेदार रोशन शिरसाट उपस्थित होते. महापालिकेच्या पथकाने विभागप्रमुख योगेश कोल्हे, अन्सार अहमद, रवींद्र राठोड यांच्या देखरेखीखाली ही कारवाई केली.
अंबादेवी परिसरात रस्त्यालगत आणि दुकानांसमोर करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना ये-जा करताना अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने मंगळवारी दुपारी अचानक धडक दिली. कारवाई सुरू होताच संबंधित दुकानदारांची चांगलीच धावपळ झाली. पथकाने काही दुकानांसमोरील वाढीव भाग हटवून जागा मोकळी केली. ही कारवाई सुरू असताना सिटी कोतवाली पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. ठाणेदार रोशन शिरसाट यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. महापालिका पथकाने अतिक्रमण हटविताना संबंधितांना सूचना देत पुन्हा अतिक्रमण करू नये, असा इशाराही दिला. अचानक झालेल्या कारवाईमुळे परिसरातील इतर दुकानदारांमध्येही काही काळ चर्चा रंगली. कारवाईनंतर मात्र काही दुकानदारांनी स्वतःहून दुकानांसमोरील अतिक्रमित भाग काढून घेतला. त्यामुळे परिसरातील रस्ता आणि नागरिकांच्या ये-जा करण्यासाठी काही प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध झाली. अतिक्रमणावर अशीच कारवाई पुढेही सुरू राहणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमिवर मोहीम-महापालिकेच्या पथकाने अंबादेवी परिसरातील 2 ते 3 दुकानांवरील अतिक्रमण हटविले. कारवाईची चाहूल लागताच काही दुकानदारांनी स्वतःहून वाढीव भाग काढून घेतला. पोलिस बंदोबस्तामुळे कारवाई शांततेत पार पडली. आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने कारवाई केल्याची चर्चा आहे.





