शाळा बंद करू नका, शिक्षण व्यवस्था मजबूत करा!
आझाद मैदानात ‘शाळा वाचवा-शिक्षण वाचवा’ मंचाचा एल्गार

स्वतंत्र शैक्षणिक धोरणासह शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती करण्याची मागणी
अमरावती/6 ऑक्टोबर : कमी पटसंख्येच्या कारणावरून राज्यातील प्राथमिक, अनुदानित माध्यमिक शाळा तसेच मान्यताप्राप्त महाविद्यालये बंद करू नयेत, शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत आणि खासगीकरणाऐवजी सार्वजनिक शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करावी, या मागण्यांसाठी ‘शाळा वाचवा-शिक्षण वाचवा मंचा’तर्फे मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलनाला सोमवारपासून सुरुवात झाली. राज्यातील शिक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी स्वतंत्र, लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक शैक्षणिक धोरण तयार करावे, अशी आग्रही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. राज्यभरातील शिक्षणप्रेमी, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक आणि विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा व महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा, प्रत्येक वर्गासाठी तसेच प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, शिक्षकांची रिक्त पदे भरावीत, अशा विविध मागण्या आंदोलकांनी लावून धरल्या आहेत. शाळा बंद करण्याऐवजी त्यांना आवश्यक सुविधा, शिक्षक आणि शैक्षणिक संसाधने उपलब्ध करून देऊन सार्वजनिक शिक्षण व्यवस्था मजबूत करावी, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.तसेच शिक्षका कडील अशैक्षणिक कामे,ऑनलाईची कामे काढून घेऊन शिक्षकांना पूर्ण वेळ शिकविण्याचे काम करु दयावे ही महत्वाची मागणी यावेळी करण्यात आली. राज्यभरातून शिक्षक, पालकांचा सहभाग-आंदोलनात कॉ. संपत देसाई, संजय वेतुरेकर, सिद्धार्थ जगदेव, अंकुश कदम, नंदा कांबळे, तुषार सूर्यवंशी, दीप्ती शेलार, सुधाकर सावंत, प्रसाद पाटील, संभाजी बापट, वैभव चोपकर, दत्ता ढगे, शहाजी देसाई, युवराज पोवार, प्रकाश मोरुस्कर, उमेश देसाई, सुनील शिंदे, शिवाजी बोलके, राजेंद्र यादव यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी व पालक सहभागी झाले. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी कोल्हापूर, सिंधुदुर्ग, धुळे, मुंबई, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतील शिक्षक, पालक व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले. शाळा वाचल्या तरच सार्वजनिक शिक्षण व्यवस्था टिकेल, या भूमिकेतून आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.अशी माहिती शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धीप्रमुख राजेश सावरकर यांनी दिली.
बुधवारी शिक्षण सचिवांसोबत स्वतंत्र बैठक
दरम्यान, सोमवारी सायंकाळी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी मंत्रालयात बोलावले. सुमारे पावणेदोन तास झालेल्या बैठकीत विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्रातील एकही शाळा बंद करणार नाही, अशी ग्वाही शिक्षणमंत्र्यांनी दिल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. यावेळी 15 मार्च 2024 रोजीच्या संचमान्यतेच्या निर्णयावरही प्रदीर्घ चर्चा झाली. मात्र, या विषयावर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे बुधवारी शिक्षण सचिवांसोबत स्वतंत्र बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कॉ. संपत देसाई यांनी स्पष्ट केले.





