आज आशियाई क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंची विजयोत्सव मिरवणूक

अमरावतीच्या सुवर्णकन्यांचा देशभर डंका

जपानमधील आंतरराष्ट्रीय मैदानात महाराष्ट्रासह अंबानगरीचा नावलौकिक
राजकमल चौक येथून स्वागत रॅली व जाहीर नागरी सत्कार सोहळा

अमरावती/4 ऑक्टोबर– जपानमधील ऐची व नागोया येथे पार पडलेल्या विसाव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासह शहराचा नावलौकिक वाढवणार्‍या अमरावतीच्या सुवर्णकन्या कुमकुम मोहोड, भारती फुलमाळी आणि यशदिप भोगे या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी सोमवारी 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.30 वाजता राजकमल चौक येथून भव्य स्वागत रॅली व जाहीर नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा अमरावती विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना, जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटना, शाळा तसेच महाविद्यालयांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत कुमकुम मोहोड हिने धनुर्विद्या रिकर्व्ह प्रकारात 2 सुवर्ण आणि 1 रौप्य अशी तीन पदके जिंकून अमरावतीची शान वाढवली. तसेच क्रिकेट प्रकारात भारती फुलमाळी हिने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. धनुर्विद्या कंपाऊंड प्रकारात यशदिप भोगे याने अचूक वेध घेत रौप्यपदक पटकावून विदर्भाचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर रोवला. या लाडक्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी राजकमल चौक ते मोर्शी मार्गावरील विभागीय क्रीडा संकुल अशी भव्य स्वागत मिरवणूक काढली जाणार आहे. या विजयी मिरवणुकीत खेळाडूंचा फुलांची उधळण करून वाजतगाजत गौरव करण्यात येईल. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शहरातील नागरिक, क्रीडाप्रेमी, तरुण खेळाडू तसेच विविध क्रीडा पुरस्कारार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे. आपल्या मातीतील लेकींनी जगाच्या पाठीवर मिळवलेल्या या मोठ्या यशाचा जल्लोष शहरात साजरा होणार आहे.
भव्य स्वागत रॅलीची जोरदार जय्यत तयारी-राजकमल चौक ते विभागीय क्रीडा संकुल मोर्शी रस्ता या मार्गाने 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.30 वाजता भव्य स्वागत रॅली निघणार आहे. शहरातील क्रीडाप्रेमी आणि नागरिकांनी उपस्थित राहून आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणार्‍या खेळाडूंचा उत्साह वाढवावा असे जाहीर आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

Back to top button