इतर समाजांच्या वाट्यात कपात नाही
मराठा आरक्षणाबाबत फडणवीस यांची ग्वाही

जालना /8 सप्टेंबर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या 11 दिवसांपासून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत. सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेतली. मात्र त्यानंतरही मनोज जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहेत आणि ते सरकारवर टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे आता सरकारने देखील नाराजी व्यक्त केली आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली की, मनोज जरांगे यांचे समाधान होत नसेल तर आमचा पर्याय नाही. तसेच मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ आता अंतरवाली सराटीत जाणार नाही, अशी कठोर भूमिका राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केली. यासंदर्भात आता मनोज जरांगें यांनी संताप व्यक्त केला आहे.राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधताना मनोज जरांगे म्हणाले की, राधाकृष्ण विखे पाटील मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष झाल्यानंतर मराठा समाजाला नेता मिळाला आहे, असं वाटलं होतं. ते समाजाचं कल्याण करतील, असंही वाटलं. पण त्यांनी आपल्याला पुरात नेलं आणि तिथे सोडून ते मागे आलेत आहेत. खरं तर राधाकृष्ण विखे पाटील हे सर्वात जास्त निष्क्रिय अध्यक्ष आहेत. त्यांनी मराठा समाजावर हल्ल्याचं नियोजन केलं. त्यांना उपसमितीचं अध्यक्ष पद हवं, मात्र आम्ही बोलल्यावर त्यांना राग येतो. तुम्ही फक्त आमच्यावर हल्ला करा, मग तुम्हाला उभं राहायलाही जागा राहणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला.
आम्ही एक पाऊल पुढे यायचं म्हणजे काय? असा प्रश्न उपस्थित करत मनोज जरांगे म्हणाले की, तुम्ही मराठ्यांचं वाटोळं करून बसला आहात. त्यामुळे तुम्हाला आता सुट्टी नाही. हे काम करताना सत्तेचा आनंद घ्यावा लागतो, तेव्हा अपमान पचवण्याची देखील ताकद असली पाहिजे. देवेंद्र फडणवीस त्यांना (राधाकृष्ण विखे पाटील) मराठ्यांचं काम करू देत नाहीत. तसेच फडणवीसांनी त्यांना आमच्यामध्ये घातलं आणि फडणवीसांचं स्वप्न विखेंनी पूर्ण केलं. त्यामुळे आता विखेंनी समाजाला खरं बोलावं, कारण आतापर्यंत समाजाचं खूप वाटोळं झालं आहे. सातारा संस्थानचं गॅझेट एका महिन्यात देतो असे ते म्हणाले होते, पण आता वर्ष होईल. मग काय दिलं तुम्ही? उलट इतका नाश केला. तुम्ही मराठ्यांना मोठं करायला आला की मराठ्यांना संपवायला आलात? असा प्रश्न उपस्थित करत मराठ्यांचं वाटोळं करण्यामागे राधाकृष्ण विखे पाटील आहेत, असा थेट आरोप मनोज जरांगे यांनी केला.
आम्ही चर्चेची दारे बंद केलेली नाहीत : विखे पाटील
जे शक्य आहे, ते आम्ही करू. आम्ही चर्चेची दारे कधीही बंद केलेली नाहीत. सरकार हे चर्चा करून मार्ग काढत असते. त्या दृष्टीने सगळी कार्यवाही चाललेली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दुसरीकडे, सरकारकडून जे निर्णय घेणे आवश्यक होते, ते घेण्यात आले आहेत. त्यामध्ये त्यांचे (मनोज जरांगे पाटील) समाधान होत नाही. आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असतील अनुत्तरित राहिलेले, ते सोडवत आहोत. आता शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटायला जाणार नाही, असे मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.





