विषारी दारूमुळे 11 जणांचा मृत्यू

मध्यप्रदेशातल्या सागर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

सागर/6 सप्टेंबर : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात विषारी दारू सेवनामुळे 11 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बांदा ब्लॉकमधील नौरज आणि गुगरा खुर्द या दोन गावांमध्ये शनिवार आणि रविवारदरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली. सागरचे आयुक्त, पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी अधिकार्‍यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नागरिकांच्या आरोग्याची आणि उपचारव्यवस्थेची माहिती घेतली. घटनेनंतर प्रशासनाने अवैध दारू विक्रीविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. खबरदारीचा भाग म्हणून परिसरातील सहा दारूची दुकाने सील करण्यात आली असून संबंधित नमुने तातडीने तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Back to top button