नेपाळच्या महापुरात 288 भारतीय बेपत्ता?

परराष्ट्र मंत्रालयाकडून विशेष नियंत्रण कक्ष

21 जणांची सुटका, तर 200 जण तिबेटमध्ये अडकले
अडकलेल्यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडवर

नवी दिल्ली/27 ऑगस्ट : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे किमान 270 लोकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर, परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, 288 हून अधिक भारतीय नागरिकांशी संपर्क होऊ शकलेला नाही; तसेच मंत्रालयाने सुटका करण्यात आलेल्या नागरिकांविषयीही माहिती दिली.
प्राथमिक माहितीचा हवाला देत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, संपर्क तुटलेल्या 288 भारतीय नागरिकांमध्ये ’त्रिशुली 1’ ऊर्जा प्रकल्पावर काम करणारे 73 लोक; तसेच ’सम्राट’ आणि ’फ्लाय एव्हरेस्ट ट्रॅव्हल्स’द्वारे अमरनाथ यात्रेसाठी गेलेले तमिळनाडूतील 37 आणि 49 नागरिकांचे दोन स्वतंत्र गट यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, ’सम्राट ट्रॅव्हल्स’च्या मदतीने रसुवा जिल्ह्यात गेलेला पश्चिम बंगालमधील 32 नागरिकांचा गट; ’रिचा टूर्स’द्वारे गेलेला विविध राज्यांतील 61 भारतीय नागरिकांचा गट आणि केरळमधील 33 भारतीय नागरिकांचा गट यांच्याशीही संपर्क होऊ शकलेला नाही.सुटकेच्या प्रयत्नांबाबत बोलताना जयस्वाल म्हणाले की, तमिळनाडूतील 21 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली असून, त्यांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्याची व्यवस्था केली जात आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, अमरनाथ यात्रेसाठी गेलेले काही भारतीय नागरिक सध्या चीनच्या हद्दीत अडकले आहेत. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बीजिंगमधील भारतीय दूतावास प्रयत्न तीव्र करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांनी माहिती दिली की, किमान 200 भारतीय नागरिकांनी मदतीसाठी संपर्क साधला आहे; त्यापैकी 95 जण ’दारचेन’ येथे असून ते सध्या नेपाळच्या दिशेने येत आहेत. जयस्वाल यांनी माहिती दिली की, ’ईशा फाउंडेशन’चे सदस्य – ज्यामध्ये भारतीय वंशाचे लोक, परदेशी नागरिक आणि इतर भारतीय नागरिकांचा समावेश आहे – ते नेपाळमध्ये अडकले असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

नेपाळमध्ये मृतांचा आकडा 380 वर

शेकडो बेपत्ता, 30 हून अधिक देशांतील नागरिकांचा समावेश

नेपाळमध्ये भोटेकोशी आणि त्रिशूली नद्यांना आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. पोलिस अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, मृतांचा आकडा 353 वर पोहोचला असून ताज्या माहितीनुसार तो 359 पर्यंत वाढला आहे. शेकडो जण अद्याप बेपत्ता आहेत. विविध यंत्रणांच्या आकडेवारीनुसार बेपत्तांची संख्या वेगवेगळी असून 800 हून अधिक नागरिक बेपत्ता असल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते.या आपत्तीत नेपाळमध्ये 826 जण बेपत्ता असल्याचे यापूर्वी अधिकार्‍यांनी सांगितले होते, तर तिबेटमध्ये 558 जण बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली. नेपाळ पर्यटन मंडळाने गुरुवारी 667 जण बेपत्ता असल्याचे सांगितले असून त्यात 11 भारतीयांचा समावेश आहे. विविध देशांतील नागरिकही बेपत्ता असून भारत, चीन, अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, रशिया, फ्रान्स, जर्मनी, इटली, पोर्तुगाल, नेदरलँड्स, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, युक्रेन, इस्रायल यांसह 30 हून अधिक देशांतील नागरिकांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

Back to top button