इथेनॉलमुळे साखरेचे दर वाढले नाहीत

केंद्र सरकारचं स्पष्टीकरण, मग काय आहे दरवाढीमागचे कारण?

नवी दिल्ली/21 ऑगस्ट :भारतात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने साखरेच्या किमती झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. घाऊक बाजारात साखरेचा दर तब्बल 80 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. इथेनॉलच्या उत्पादनासाठी उसाचा वापर वाढल्यामुळे साखरचे दर वाढले आहेत, असा दावा विरोधी पक्षांकडून केला जात आहे. परंतु, केंद्र सरकारने साखरेच्या दरवाढीला इथेनॉल जबाबदार नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. साखरेच्या दरवाढीला इथेनॉलला दोष देणे चुकीचे आहे. 2022-23 मध्ये इथेनॉल बनवण्यासाठी 12 टक्के साखर वापरली जायची, ती आता कमी होऊन 9 टक्क्यांवर आली आहे. आता देशात तयार होणार्‍या एकूण इथेनॉलपैकी पाऊण 75 टक्के भाग हा साखरेऐवजी धान्यापासून, विशेषतः मक्यापासून बनवला जातो. इथेनॉलच्या निर्मितीमुळे साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे. कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे 20 ऑगस्ट 2026 पर्यंत ऊस उत्पादक शेतकर्‍यांची 97 टक्के थकबाकी देण्यात आली आहे. 2014 ते 2021 या काळात सरकारला साखर उद्योगाला तब्बल 14,600 कोटी रुपयांचे अनुदान द्यावे लागले होते.परंतु, 2021-22 पासून साखर उद्योगाला कोणत्याही सरकारी अनुदानाची गरज पडलेली नाही. चालू हंगामात देशात 306 लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. सुरुवातीला ऊस उत्पादक राज्यांनी 343 लाख टनांचा अंदाज वर्तवला होता. मात्र, अतिवृष्टी, शेतात पाणी साचणे आणि उसावर पडलेला रेड रॉट व टॉप बोरर या कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे साखरेचे उत्पादन घटले आहे. उत्पादन घटले असले तरीही ऑक्टोबरमध्ये नवीन गाळप हंगाम सुरू होईपर्यंत देशातील साखरेची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेशी साखर शिल्लक आहे, असा दिलासा सरकारने दिला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button