2005 पूर्वीचे शिक्षक जुनी पेन्शनपासून वंचित
पेन्शन लागू करा, शिक्षक सेनेची मागणी

अमरावती /16 ऑगस्ट: 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात प्रसिद्ध होऊन त्याच कालावधीत नियुक्त झालेल्या अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना केवळ शाळेला 100 टक्के अनुदान नंतर मिळाले म्हणून जुनी पेन्शन योजनेपासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे, असा सवाल महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे खाजगी विभाग अमरावतीचे अध्यक्ष रुपेश टाले यांनी केला आहे.
शासकीय कर्मचार्यांना जुनी पेन्शनचा लाभ दिला जात असेल, तर समान परिस्थितीतील अनुदानित शाळांतील कर्मचार्यांसाठी वेगळा निकष का, असा प्रश्न उपस्थित करत 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त पात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी टाले यांनी केली.
नियुक्तीची तारीख, जाहिरात व निवड प्रक्रिया 2005 पूर्वीची असताना केवळ अनुदानाचा टप्पा नंतरचा असल्यामुळे कर्मचार्यांना जुनी पेन्शनपासून वंचित ठेवू नये. न्यायालयीन निर्णयांचा विचार करून शासनाने सर्वसमावेशक निर्णय घ्यावा.




