भाजपाची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर
महाराष्ट्राच्या 5 दिग्गजांचा समावेश

पीयूष गोयल कोषाध्यक्ष, विनोद तावडे महासचिव तर भारती पवार यांच्यावर उपाध्यक्ष पदाची धुरा
नवी दिल्ली/17 ऑगस्ट: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी सोमवारी पक्षाच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकार्यांची घोषणा केली. नव्या टीममध्ये अनेक वरिष्ठ नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदार्या देण्यात आल्या असून, नियुक्त्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत.
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांच्यासह 13 नेत्यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर स्मृती इराणी आणि विनोद तावडे यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भाजपच्या नव्या यादीत वसुंधरा राजे सिंधिया, तीरथ सिंह रावत, राम माधव, बैजयंत जय पांडा, डी. पुरंदेश्वरी, रेखा वर्मा, वर्षाबेन नरेंद्रभाई दोशी, डॉ. भारती प्रवीण पवार, सरदार मनप्रीत सिंह बादल, लाल सिंह आर्य, प्रो. एम. नागराजा, प्रो. तारिक मंसूर आणि डॉ. मधुचंद्र कर यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्यात आले आहे. या नियुक्त्यांमध्ये विविध राज्यांतील नेत्यांना स्थान देण्यात आले असून, पक्षाच्या केंद्रीय संघटनेत प्रादेशिक प्रतिनिधित्वाचा समतोल साधण्याचा प्रयत्न दिसून येतो.भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. राष्ट्रीय पातळीवरील संघटनात्मक कामकाजात त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांची भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. द्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.मुंबईचे प्रतिनिधित्व करणारे शिवप्रकाश यांची राष्ट्रीय सह-संघटन सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचा डिजिटल आणि सोशल मीडिया विस्तार अधिक प्रभावी करण्यासाठी प्रीती गांधी यांच्याकडे सोशल मीडिया सह-संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
आयटी सेलच्या प्रमुख पदी दीपक म्हस्के यांची निवड
एका मोठ्या संघटनात्मक फेरबदलांतर्गत, भारतीय जनता पक्षाने दीपक म्हस्के यांची नवीन सोशल मीडिया प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. 58 वर्षीय म्हस्के हे छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील रहिवासी आहेत. ते अमित मालवीय यांच्याकडून ही जबाबदारी स्वीकारतील. पक्षाच्या डिजिटल आणि सोशल मीडिया विभागांमध्ये काम करण्याचा म्हस्के यांच्याकडे सुमारे 15 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी बिहार, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुकांदरम्यान भाजपच्या सोशल मीडिया मोहिमांचे नेतृत्व केले आहे.




