राष्ट्रसंतांना भारतरत्न व विकास प्रकल्पांना गती द्या

आ. राजेश वानखडे यांनी घेतली अमित शाह यांची भेट

नांदगाव पेठ एमआयडीसीत मिसाईल निर्मिती प्रकल्पाला प्राधान्य द्या
जिल्ह्यात सैनिकी स्कूलची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

अमरावती /14 ऑगस्ट: ग्रामविकासचे प्रणेता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात यावा, या मागणीसह तिवसा विधानसभा मतदारसंघ व अमरावती जिल्ह्यातील विविध महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांच्या अनुषंगाने आमदार राजेश वानखडे यांनी संदीप सायरे यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी नांदगाव पेठ एमआयडीसी येथील केंद्र शासनाच्या अंगीकृत उपक्रमातील भारत डायनामिक्स लिमिटेड (बीडीएल) या बहुप्रतिक्षित मिसाईल निर्मिती प्रकल्पाच्या रखडलेल्या कामाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. सन 2012 पासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला तातडीने गती मिळावी आणि प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरूव्हावी, अशी मागणी आ. वानखडे यांनी केली. या प्रकल्पामुळे अमरावती जिल्ह्यात रोजगारनिर्मिती, औद्योगिक विकास आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.अमरावती हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे विभागीय मुख्यालय आहे. या परिसरात युवकांना सैनिकी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारी सैनिक शाळा नसल्याचा मुद्दा आमदार वानखडे यांनी मांडला. तिवसा मतदारसंघात राज्य शासनाच्या सहभागातून केंद्रीय सैनिक स्कूल सुरू करण्यास मान्यता देण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
तसेच ग्रामीण भागातील बूथस्तरावरील कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांना अतिरिक्त उपजीविकेचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने सहकारी डेअरी प्रकल्प उभारण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. तालुकास्तरीय कॉमन फॅसिलिटी सेंटरशी या प्रकल्पाचा समन्वय साधून, केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून नाबार्डच्या अर्थसहाय्याने तिवसा विधानसभा मतदारसंघात हा पथदर्शी (पायलट) प्रकल्प राबविण्यास मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी ही करण्यात आली. या भेटीमुळे आगामी काळात तिवसा मतदारसंघासह अमरावती जिल्ह्यातील प्रस्तावित विकास प्रकल्पांना निश्चितच गती मिळेल, असा विश्वास आ. वानखडे यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

Back to top button