सरकारी रुग्णालयात आता मिळणार पोषणयुक्त आहार

अन्नाची गुणवत्ता तपासण्यासाठी दरमहा लॅब चाचणी

कर्मचार्‍यांची दर तीन महिन्यांनी आरोग्य तपासणी

अमरावती /3 ऑगस्ट- सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांना आता स्वच्छ, पौष्टिक आणि गुणवत्तापूर्ण आहार उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने नवीन आणि कडक मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. रुग्णांना दिल्या जाणार्‍या आहाराची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी आता दरमहा अन्नपदार्थांची लॅब चाचणी, दर तीन महिन्यांनी स्वयंपाक करणार्‍या व वाढणार्‍या कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक, अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षक यांच्यामार्फत नियमित पाहणी अनिवार्य करण्यात आली आहे. सरकारी रुग्णालयांतील आहाराच्या गुणवत्तेबाबत दीर्घकाळापासून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारी येत होत्या. अनेक ठिकाणी थंड अन्न, चवहीन जेवण, स्वच्छतेचा अभाव आणि हलक्या दर्जाची डाळ, भाज्या व अन्नधान्य यांवर प्रश्न उपस्थित केले गेले होते. याच तक्रारींची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे. नवीन व्यवस्थेअंतर्गत रुग्णालयांचे स्वयंपाकघर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अन्नधान्याची साठवणूक, जेवण बनवणे आणि वाटप या संपूर्ण प्रक्रियेवर नियमित देखरेख ठेवली जाईल. तसेच सर्व नोंदींची पाहणी केली जाईल. जिल्हा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालिटी रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांना शासनाच्या वतीने मोफत नाश्ता, दुपारचे जेवण, सायंकाळचा अल्पोपहार आणि रात्रीचे जेवण उपलब्ध करून दिले जाते. नवीन व्यवस्थेनुसार दरमहा अन्नाचे नमुने मान्यताप्राप्त लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवणे, अन्नधान्य, तेल, मसाले, पिण्याचे पाणी आणि पोषण गुणवत्तेची तपासणी करणे, दर तीन महिन्यांनी किचन कर्मचार्‍यांची वैद्यकीय तपासणी, संसर्ग, त्वचा आणि पोटाशी संबंधित आजारांची तपासणी अनिवार्य, हातमोजे, कॅप आणि प्रन घालणे बंधनकारक तसेच जिल्हा शल्यचिकित्सक, अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक आणि हॉस्पिटल क्वालिटी कंट्रोल कमिटीद्वारे नियमित पाहणी केली जाईल.

जिल्हा रुग्णालयात रुग्णांना सकाळी चहा, दूध, पोहे, उपमा किंवा दलिया; दुपारी पोळी, भात, डाळ आणि भाजी; संध्याकाळी चहा, बिस्किट व हलका नाश्ता आणि रात्री पोळी, भात, डाळ, भाजी व गरजेनुसार खिचडी दिली जाते. रुग्णांना वाढल्या जाणार्‍या आहाराची नियमित तपासणी केली जाते. अधिकारी दररोज जेवणाची पाहणी करतात आणि स्वयंपाक करणार्‍या कर्मचार्‍यांची वेळेवर आरोग्य तपासणी केली जाते.
-डॉ. विनोद पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती

संबंधित बातम्या

Back to top button