जिल्ह्यात एसआयआर अभियानाचे 95.53 टक्के काम पूर्ण

जिल्हाधिकारी आशिष येरकर यांची माहिती

अमरावती /3 ऑगस्ट– भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अमरावती जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या विशेष गहन पुनरीक्षण म्हणजेच एसआयआर मोहिमेअंतर्गत मतदारयादी शुद्धीकरणाचे काम आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. जिल्ह्यातील 25 लाख 45 हजार 677 मतदारांपैकी 24 लाख 31 हजार 763 मतदारांची पडताळणी पूर्ण झाली असून 95.53 टक्के टप्पा पार करण्यात प्रशासनाला यश आले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरकर यांनी पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची माहिती दिली.
या मोहिमेत 21 लाख 37 हजार 172 मतदारांचे अर्ज संगणकीकृत करण्यात आले आहेत. तर घर बंद असणे किंवा नागरिक गावी नसणे यामुळे 2 लाख 94 हजार 591 मतदारांचे अर्ज गोळा होऊ शकले नाहीत. या नावांज्ञा विशेष श्रेणीत ठेवले असून त्यांपैकी 1,03,402 मतदार मृत आढळले, 1,36,508 जण कायमचे दुसरीकडे राहायला गेले आहेत, 11,531 जण गैरहजर होते, 933 जणांची दुहेरी नोंदणी होती तर 42,217 मतदार इतर कारणांमुळे मिळू शकले नाहीत. मुसळधार पाऊस, मेळघाटासारखा दुर्गम भाग अन् शहरातील भाडेकरूंची धरसोड सहन करत 8 मतदार नोंदणी अधिकारी, 43 सहाय्यक अधिकारी, 170 अतिरिक्त सहाय्यक, 260 पर्यवेक्षक, 2,682 बीएलओ आणि 9,159 सहाय्यकांनी घरोघरी जाऊन हे कष्टाचे काम फत्ते केले. दर्यापूर 99.12 टक्के अन् मोर्शी 97.97 टक्के कामासह सर्वात पुढे राहिले, तर अमरावती व बडनेरा भागात भाडेकरू व विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने संथ गतीने काम झाले. येत्या 17 ऑगस्टला कच्ची मतदारयादी जाहीर होईल. त्यानंतर 16 सप्टेंबरपर्यंत हरकती घेता येतील. 15 ऑक्टोबरपर्यंत सर्व शंकांचे निरसन करून 19 ऑक्टोबर 2026 रोजी नवी कोरी अन् पारदर्शक अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल, असे आशिष येरकर यांनी आवर्जून सांगितले.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button