अंजनगाव सुर्जीचा 16 वर्षीय युवक खिरपाणीच्या डोहात बुडाला
प्रशासनाच्या बंदी नंतरही पर्यटकांचा निष्काळजीपणा

एनडीआरएफकडून शोधमोहीम सुरू
अंजनगाव सुर्जी/30 जुलै -सातपुड्याच्या निसर्गरम्य कुशीत वसलेल्या खिरपाणी येथील धबधबा पाहण्यासाठी मित्रांसोबत गेलेल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन युवकाचा डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आदित्य कमलेश ओळंबे (वय 16, रा. अंजनगाव सुर्जी) असे मृत युवकाचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी सुमारे 4 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
मित्रांचे ऐकले नाही आणि घडला अनर्थ-मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य आपल्या काही मित्रांसोबत सातपुड्याच्या जंगलात खिरपाणी धबधबा व निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी गेला होता. धबधब्याखालील धोकादायक डोहामध्ये आंघोळ करू नको, असे त्याच्या मित्रांनी त्याला वारंवार बजावले होते. मात्र, मित्रांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करत आदित्यने डोहात उतरण्याचा प्रयत्न केला. काही क्षणातच तो खोल पाण्यात नाहीसा झाला आणि परत बाहेर आलाच नाही.
स्थानिक प्रशासनाचे आवाहन:-परिसरात स्पष्ट शब्दांत इशारा देणारे ’सूचना फलक’ लावले असतानाही, अनेक पर्यटक आणि तरुण सुरक्षेची पर्वा न करता सेल्फी काढण्यासाठी किंवा आंघोळ करण्यासाठी डोहाजवळ जातात. त्यामुळे असे दुर्दैवी अपघात वारंवार घडतआहेत. पाऊस आणि अंधारामुळे शोधमोहिमेत अडथळे-घटनेची माहिती मिळताच तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी तातडीने एनडीआरएफ (छऊठऋ) टीमला पाचारण केले असून पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. शोधमोहीम तातडीने सुरू करण्यात आली आहे; परंतु रात्रीची वेळ आणि सतत सुरू असलेला मुसळधार पाऊस यामुळे बचावकार्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे. या घटनेमुळे अंजनगाव सुर्जी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पर्यटकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे आणि जिवाचा धोका पत्करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे पुन्हा एकदा करण्यात आले आहे.




